ऊसदरासाठी कोल्हापुरात शिवसेनेचा रास्तारोको Print

कोल्हापूर / प्रतिनिधी

आगामी गळीत हंगामात उसाला पहिली उचल प्रतिटन ३ हजार रूपयेप्रमाणे मिळावी, या मागणीसाठी शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने मुधाळतिट्टा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी घोषणाबाजी करीत रास्तारोको केल्याने वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह शिवसैनिक, शेतकऱ्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली.
यावर्षीच्या ऊस गळीत हंगामाला सुरूवात झाली आहे. बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ झाल्यानंतरआता प्रत्यक्षात गाळपास सुरूवात होते आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने, ऊस उत्पादनाचा खर्च वाढल्याने व टनेज कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा अशी शिवसेनेची मागणी आहे. या मागणीसाठी शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. कागल, भुदरगड व राधानगरी या तीन तालुक्यांना जोडणारा भाग म्हणून मुधाळतिट्टा हा परिसर ओळखला जातो. तिंन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या चौकात शिवसैनिक दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जमले. ऊसाला पहिली उचल ३ हजार रूपये मिळावे, अशी घोषणा देत रास्तारोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.या वेळी जिल्हाप्रमुख देवणे यांचे भाषण झाले. त्यांनी राज्यातील आघाडी शासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता साखर कारखानदारांसमवेत बैठक घेऊन ३ हजार रूपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी करीत यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, असा आग्रह धरला. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रवीण सावंत, राधानगरी तालुका प्रमुख तानाजी चौगुले, तालुका प्रमुख भिकाजी हळदकर, महिला आघाडी संघटक सुषमा चव्हाण,कागल तालुका प्रमुख अशोक पाटील, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, महिला संघटक रंजना आंबेकर, मेरी डिसोजा, हर्षल पाटील आदी सहभागी झाले होते. तासाभराच्या आंदोलनानंतर पोलिसांनी या सर्वाना अटक केली व त्यानंतर त्यांची सुटका केली.