बांगलादेशी घुसखोरांची चौकशी सुरू Print

घुसखोरांमागील एजंटचाही शोध घेणार
कोल्हापूर / प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

कोल्हापूरमध्ये आढळलेल्या २८ बांगलादेशी घुसखोरांची कसून तपासणी करण्याचे काम जुना राजवाडा पोलिसांनी हाती घेतले आहे. घुसखोरांकडे मिळालेले मोबाईल, त्यातील सीमकार्ड त्याआधारे शोध घेतला जाणार आहे. या घुसखोरांमागे असणाऱ्या एजंटचाही शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे सर्व घुसखोरांवर दावा चालवून त्यांना शिक्षा व्हावी, यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत, असे पोलीस निरिक्षक यशवंत कडेगे यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील गुजरी पेठ, महाद्वार परिसरात ३०० बांगलादेशी नागरिक राहात असून त्याची तपासणी करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे जुना राजवाडा पोलिसांकडे केली आहे.
कोल्हापुरातील बांधकामाच्या ठिकाणी गुरुवारी २८ बांगलादेशी घुसखोर आढळले. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या सर्वाना अटक झाली असून २९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मिळाला आहे. घुसखोरांकडून पोलिसांनी २० मोबाईल व सीमकार्ड ताब्यात घेतले आहेत. त्याच्याकडे ती कशी उपलब्ध झालीत, त्यासाठी कोणती कागदपत्रे वापरण्यात आली, कागदपत्रे खरी आहे की बनावट,ती कागदपत्रे त्यांना कोणी मिळवून दिली, त्यामागे कोण सूत्रधार आहे आदी मुद्यांच्या आधारे जुना राजवाडा पोलिसांनी तपास चालू ठेवला आहे.
बांगलादेशी घुसखोरांना कोल्हापूरमध्ये आणण्यात एजन्सीचा सहभाग आहे, ही एजन्सी कोणाची आहे, त्यांनी घुसखोरांची माहिती न घेता कामावर कसे ठेवले यामागे कटकारस्थानाचा डाव आहे का या अंगानेही तपास केला जात आहे. याकरिता घुसखोर आरोपींकडून माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. त्याच्याकडील माहिती घेऊन सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.
या सर्व घुसखोरांना २९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यानंतर पोलिसांची भूमिका काय असणार त्यासंदर्भात विचारले असता पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी या सर्व आरोपींवर दावा चालवून त्यांना शिक्षा व्हावी, असा प्रयत्न राहणार आहे, असे सांगितले.
दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर, उपप्रमुख जयवंत हरूगले, तुकाराम साळोखे, दुर्गेश लिंग्रज, गजानन भुरके, सुनील साळोखे आदी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी राजवाडा पोलिसांना निवेदन दिले. त्यामध्ये गुजरी, महाद्वार रोड येथील दुकानांमध्ये ३०० बांगलादेशी काम करीत असून त्यांची तपासणी व्हावी, त्यांना रेशनकार्ड मिळवून देणाऱ्यांची चौकशी व्हावी, या कामगारांना भारतात आणणाऱ्या एजंटांची साखळी तपासली जावी, यामध्ये बालकामगार अधिक असून त्यांचा शोध घेतला जावा, आदी मागण्यांचा उल्लेख आहे.