लेखाधिकारी सुनील रेणके यांना निलंबित करण्याची मागणी Print

कोल्हापूर जिल्हा परिषद
 कोल्हापूर / प्रतिनिधी
केवळ टक्केवारीच्या हव्यासापोटी अधिकार नसतानाही कामाचे वाटप करणारे व प्रवास न करताचा भत्ता लाटणारे जिल्हा परिषदेचे सहायक लेखाधिकारी सुनील रेणके यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी. डी. डोके यांना दिले.
या निवेदनात रेणके यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचण्यात आला. रेणके  यांना निलंबित न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. डोके यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी लेखी पुरावे सादर करत सहायक लेखाधिकारी सुनील रेणके यांच्या भ्रष्टाचाराचा व गैरव्यवहाराचा पाढाच डोके यांच्यासमोर वाचला. बांधकाम विभागात लिफ्ट घोटाळा केलेले रेणके जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सहायक लेखाधिकारीपदावर कार्यरत आहेत. आरोग्य विभागातही वाहने भाडय़ाने घेणे, कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार नेमणे अशा विविध कामांतही त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 विविध कामांमध्ये रेणके यांनी टक्केवारीसाठी अधिकार नसतानाही कामांचे वाटप केले आहे. अशा या भ्रष्ट अधिकाऱ्याला प्रथम निलंबित  करून त्याच्या गैरकारभाराची चौकशी करून बडतर्फ करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. संजय पाटील  अनिल कवाळे, तानाजी मोरे, विकास भोसले, सुनील मोरे, प्रकाश पाटील, शकिल गवंडी, अजिम खान हे उपस्थित होते.