मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर Print

सोलापूर /प्रतिनिधी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उद्या रविवारी सोलापूर जिल्ह्य़ाच्या भेटीवर येत असून दिवसभरात त्यांच्या हस्ते तीन साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेदेखील सोलापुरात दाखल होत आहेत.
सुशीलकुमार शिंदे हे दोन दिवसांच्या भेटीसाठी मुंबईहून सकाळी सिध्देश्वर एक्सप्रेसने येत आहेत, तर मुख्यमंत्री चव्हाण हे सकाळी ९.२० वाजता विमानाने येत आहेत. नंतर चव्हाण व शिंदे हे दोघे एकत्रपणे विविध साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सकाळी १० वाजता अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री लक्ष्मी साखर कारखाना तथा सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन तथा प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ वाजता अक्कलकोट येथे स्वामी समर्थ आश्रमाच्या कार्यक्रमातही मुख्यमंत्री चव्हाण व केंद्रीय गृहमंत्री शिंदे हे सहभागी होणार आहेत.
त्यानंतर दुपारी एक वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांच्या सिध्दनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या सीताराम महाराज साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ तथा सहवीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी ४.२० वाजता सोलापूर विमानतळावरून विमानाने मुख्यमंत्री चव्हाण हे नागपूरकडे रवाना होणार आहेत.