सोलापुरात बकरी ईद उत्साहात Print

सोलापूर,/प्रतिनिधी
ईश्वराप्रति असीम निष्ठा, त्याग आणि बलिदानाचा संदेश देणारी ईद-उल-जुहा (बकरी ईद) सोलापुरात शनिवारी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी सर्व मशिदी व ईदगाहांमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. यात हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.
इसवीसनपूर्व काळात अरबस्थानामध्ये ईश्वर भक्तीने प्रेरित होऊन हजरत इब्राहिम हे आपले चिरंजीव हजरत इस्माईल यांची कुर्बानी देण्यास तयार झाले आणि ईश्वराच्या कसोटीस उतरले गेले. त्यांच्या त्यागी वृत्तीचे आणि ईश्वरी भक्तीचे स्मरण म्हणून दरवर्षी ‘ईद-उल-जुहा’ साजरा केला जातो. ईदनिमित्त शहरात सकाळी आदिलशाही ईदगाह (जुनी मिल पटांगण), आलमगीर ईदगाह (पानगल प्रशाला प्रांगण), नवीन आलमगीर ईदगाह (होटगी रोड), आसार मैदान आणि अहले हदीस ईदगाह (शिवछत्रपती रंगभवन) या प्रमुख ईदगाहांमध्ये, तसेच सर्व मशिदींमध्ये आबालवृध्द मुस्लिमांनी सामूहिक नमाज अदा केली.
नमाजानंतर श्रीमंत व ऐपतदार कुटुंबीयांनी आपापल्या घरी बकरा, मेंढा आदी जनावरांची कुर्बानी दिली. दानधर्मही करण्यात आला. होटगी रस्त्यावरील नया आलमगीर ईदगाह येथे सामूहिक नमाज पठणाचे अधिपत्य शहर काझी सय्यद मुझफ्फरहुसेन यांचे नातू अमजदअली काझी यांनी केले. खुत्ब्याचे वाचनही त्यांनीच केले. ईश्वराच्या भक्तीसह आई-वडिलांचीही श्रध्दापूर्वक सेवा करावी. त्यामुळे तरुणांना हाज यात्रेचे पुण्य लाभते. हजरत इब्राहिम व हजरत इस्माईल यांच्या त्यागी वृत्तीचे श्रध्दापूर्वक स्मरण करताना मुस्लीम बांधवांनी आपल्या भारत देशाच्या उन्नतीसाठीही त्याग करण्याची भूमिका अंगीकारावी,असे विचार काझी यांनी व्यक्त केले.
पानगल प्रशालेच्या प्रांगणात आलमगीर ईदगाह येथे शहर काझी सय्यद मुझफ्फर हुसेन व त्यांचे चिरंजीव तथा माजी जिल्हा सरकारी वकील अब्बास काझी यांनी, तर आदिलशाही ईदगाहवर (जुनी गिरणी) सय्यद खतीबसाहेब यांनी आणि आसार मैदान ईदगाहवर मौलाना अ. सलाम रिझवी यांनी नमाज पठणाचे अधिपत्य केले. सय्यद खतीब यांनी खुत्बावाचन करताना प्रखर ईश्वरीनिष्ठेचे द्योतक म्हणजे ‘ईद-ऊल-अजहा’ असल्याचे नमूद करीत जगात शांती व सद्भावना निर्माण होण्यासाठी प्रार्थना केली. नमाजानंतर सर्वानी एकमेकास भेटून शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. हिंदू बांधवांनीही मैत्रीच्या सद््भावना जपत मुस्लीम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.
ईदनिमित्त कुर्बानीसाठी यंदा बाजारात बकरा, मेंढी व अन्य जनावरांची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली. बक ऱ्यांचे भाव ५ हजारांपासून ते ३० हजारांपर्यंत होते. मंगळवार बाजार, किडवाई चौक, होम मैदान आदी भागात बकरे व मेंढय़ा खरेदीसाठी ईदच्या दिवशीही गर्दी उसळली होती. यंदा राज्यातून तसेच गुजरात, राजस्थान,उत्तर प्रदेश आदी भागातून विविध जातींचे बकरे विक्रीसाठी आले होते. यात लाखोंची उलाढाल झाली.