रा. ना. चव्हाण जन्मशताब्दी वर्ष सुरू; वर्षभर विविध कार्यक्रम Print

वाई/वार्ताहर
दलितमित्र रा. ना. चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष सोमवार २९ पासून सुरू होत आहे. या निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
संस्कार, संत्संग व व्यासंग या बलस्थानातून निर्माण झालेले रा. ना. चव्हाण यांनी कर्मवीर भाऊराव पाटील व शिक्षणानंद बापूजी साळुंखे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ध्येयधोरणांना सामाजिक आशय निर्माण करून देण्याचे काम केले.
त्यांनी आपल्या कारकीर्दीत ४२५ लेख, २२ पुस्तके संकलित केली. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानव मुक्तीच्या विचारांची निष्ठा बाळगून त्यांनी विपुल व कसदार लेखन केले, अविरत साठ वर्ष समाजप्रबोधन केले. त्यांची जन्मशताब्दी विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार असल्याचे रमेश चव्हाण व रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
सोमवार, २९ ऑक्टोबर रोजी रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, बॅ. पी.जी. पाटील सार्वजनिक वाचनालय, सातारा, तेजस्विनी केटर्स उद्योग समूह, सातारा, महाराणी ताराबाई महिला सह पतसंस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मोसमाज कार्यालयात शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक भोईटे, डॉ. अशोक चौसाळकर व डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत ‘रा. ना. चव्हाण व महाराष्ट्रातील प्रबोधन विचार’ या विषयावर व्याख्यानाने जन्मशताब्दी वर्षांला सुरुवात होणार आहे.
वर्षभर महाविद्यालये व विद्यापीठातून रा. ना. चव्हाण वाङ्मयावर चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. महात्मा फुले व त्याचे कार्य तरुण पिढीस ज्ञात होण्यासाठी निबंध स्पर्धा, सत्यशोधकांच्या चरित्र कोशास निधी मिळवून देणे. रा. ना. चव्हाण यांच्या निवडक लेखांचा संग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.