सत्ताधारी पुढाऱ्यांकडून पाण्याचा बेकायदा उपसा; बोंबाबोंब आंदोलन Print

सोलापूर /प्रतिनिधी, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

यंदा दुष्काळाची भीषण परिस्थिती ओढवली असताना मोहोळ तालुक्यातील तलावात सत्ताधारी राजकीय पुढारी व हितसंबंधियांच्याच विद्युत मोटारी सुरू असून त्याद्वारे रात्रंदिवस पाण्याचा उपसा बेकादेशीरपणे केला जात असल्याचा आरोप करीत सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोहोळ तहसील कार्यालयासमोर ‘बोंबाबोंब’ आंदोलन केले.
आष्टी तलावातील पाण्याचा साठा केवळ पिण्यासाठी राखीव असताना कायदा धाब्यावर बसवून सत्ताधारी राजकीय पुढारी व हितसंबंधियांच्या विद्युत मोटारी रात्रंदिवस सुरू करून पाण्याचा वारेमाप उपसा केला जात आहे. तीव्र दुष्काळामुळे तलावातील पाण्याचा साठा केवळ पिण्यासाठी राखीव असताना येवती तलावातील पाण्याचा साठा शेतीसाठी उपसला जात असल्याने तलावातील पाणीसाठा संपुष्टात येत आहे.  
त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या मोडनिंब, आष्टी, आदी गावांच्या पिण्याच्या पाणी योजना बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. केवळ पिण्यासाठी म्हणून गेल्या १७ सप्टेंबर रोजी तलावात पाणी सोडण्यात आले होते. परंतु धनदांडगे व सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांनी हे पाणी स्वत:च्या शेतीसाठी चक्क पळवून नेले आहे. त्याविरोधात स्थानिक शेतक ऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत जनहित शेतकरी संघटनेच्या झेंडय़ाखाली एकत्र येऊन आंदोलन केले.
संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख याच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयासमोर चक्क बोंबाबोंब आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या संदर्भात तहसीलदारांना समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले. यात संबंधितांच्या विद्युत मोटारी जप्त कराव्यात, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, याबाबत डोळेझाक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी आदी मागण्या जनहित शेतकरी संघटनेने केल्या आहेत.
या आंदोलनात भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्ता कदम, उत्तम मुळे, भानुदास कवडे, गुरुनाथ मुळे, बाळासाहेब मुळे, दीपक मुळे, कुमार गोडसे, बाळासाहेब वाघमोडे आदींसह सुमारे शंभर शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.