संक्षिप्त Print

आर्थिक मदतीचे आवाहन
कोल्हापूर / प्रतिनिधी- शिये (ता.करवीर) येथील कु. सावणी सर्जेराव चौगले (वय ९ महिने) ही हृदयविकाराने आजारी आहे. तिच्यावरील गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया तातडीने करणे आवश्यक आहे. ही शस्त्रक्रिया मुंबई येथे करावयाची असून यासाठी ३ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. मात्र सर्जेराव चौगले यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना मदतीची फार गरज आहे. तरी सेवाभावी संस्था, व्यक्ती यांना आवाहन करण्यात येत आहे. सदर मदत सर्जेराव बाबुराव चौगले (मु.पो. शिये, ता.करवीर, जि.कोल्हापूर) यांच्या नावे पाठवावी किंवा आय.डी.बी.आय.बँक खाते क्र. ५६०१०४०००००९४२३ या खाते क्रमांकावर जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आनंदा थोरात यांना ‘कृषिमित्र’ पुरस्कार
कराड/वार्ताहर- पत्रकारितेच्या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषितंत्र पोहोचविल्याबद्दल राज्य शासनातर्फे देण्यात येणारा २०११चा वसंतराव नाईक कृषिमित्र पुरस्कार कराडचे युवा पत्रकार आनंदा थोरात यांना जाहीर झाला आहे. अमरावती येथे येत्या ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
बाबूराव सणस यांचे निधन
वाई/वार्ताहर- येथील सामाजिक कार्यकर्ते व विविध संस्थांचे सदस्य बाबूराव बंडोबा सणस (गुरुजी) यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले. ते कामधेन दूध डेअरीचे अध्यक्ष, विविध संस्थांशी त्यांचा संबंध होता. सामाजिक, शैक्षणिक व वारकरी संप्रदायात त्यांचा सहभाग होता. त्यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.