म. फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन सल्लागार समितीची बैठक Print

सोलापूर /प्रतिनिधी
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक येत्या शनिवारी, ३ नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या कृषी भवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे हे भूषविणार असून कृषी विभागाचे आयुक्त उमाकांत दांगट यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सल्लागार समितीच्या बैठकीत दोन तांत्रिक चर्चासत्र होणार आहेत. पहिल्या चर्चासत्रात विभागीय रब्बी व उन्हाळी अहवाल विभागीय कृषी सहसंचालक हे जिल्हानिहाय रब्बीनिहाय व उन्हाळी हंगामांचे नियोजन तसेच प्रत्याभरणाचे सादरीकरण संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या सहभागातून करणार आहेत. याबाबतची माहिती सोलापूरच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक तथा प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. डॉ. जनार्दन कदम यांनी दिली.
कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ. हरी मोरे हे विस्तार व शिक्षणकार्याची तर संशोधन विभागाचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र पाटील हे चालू २०१२ वर्षांतील प्रसारित झालेले वाण आणि संशोधनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, आमदार विजय देशमुख यांच्यासह अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, कृषिभूषण दादासाहेब बोडके, सुरेश वागदरे, अखिल महाराष्ट्र सीताफळ संघाचे अध्यक्ष नवनाथ कसपटे आदी उपस्थित राहणार असल्याचे डॉ. जनार्दन कदम यांनी सांगितले.