एसटीचे अपंगांच्या सवलतीचे बनावट पास बनविणाऱ्यांना दोघांना अटक Print

पंढरपूर / वार्ताहर
अपंगांसाठी विविध शासकीय योजना असून त्या योजनेचा गैरफायदा घेऊन अपंगांसाठी विविध योजनेच्या सवलतीचे बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर, स्टॅम्प, फोटो तसेच आगार प्रमुख सिव्हिल सर्जन, समाज कल्याण अधिकारी यांच्या पदाच्या नावाच्या शिक्के जप्त करण्यात आले आहे. यापूर्वीही सवलतीचे पास, ओळखपत्रे बनवणारी बारा जणाची टोळी मुद्देमालासह पंढरपूर शहर पोलिसांनी पकडली होती.  
एस.टी.चे सवलतीचे बनावट पास दिले जातात असल्याची माहिती शहर निरीक्षक दयानंद गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांना मिळाली. त्याप्रमाणे पाळत ठेवली. नागप्पा मायप्पा कस्तुरे (वय ७२, रा. गणवाडी, जि. नांदेड) अंकुश दत्ता कदम (रा. कारनाळ जि. नांदेड) हे ५०० रु. व १००० रुपये घेऊन लातूर येथे बनावट पास तयार करून पंढरपुरात जुनी पेठ येथे संतोष अंबादास अभंगराव याच्या घरात उतरतात. तेव्हा घराची झडती घेतली असता अपंगांसाठीचे सवलतीचे पास दोघांकडे आढळून आले ते पोलिसांनी जप्त केले.
पोलिसांनी या दोघांकडे अधिक चौकशी केली, तेव्हा त्यांनी लातूर येथील राज झेरॉक्स या दुकानाचे मालक इरशाद निसार, अहमद सिद्दीकी हे मुख्य सूत्रधार आहेत असे सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी योग्य मार्गदर्शन केले. शहर निरीक्षक गावडे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्राची टिपरे, पो. शेख, रूपनवर, सहायक पो. नि. बाबळे यांनी लातूर तहसील कचेरीसमोर असलेल्या राज झेरॉक्स येथे छापा घातला अन् अपंगांसाठीचे बनावट सवलतीचे पास, १० ते १२ लोकांचे निवडणूक ओळखपत्र तसेच बनावट पास तयार करण्यास लागणारे सर्व साहित्य जप्त केले.
असे बनावट तयार केलेले पास विकणारी टोळीच तयार केली असून गावागावात एजन्टही नेमले असून यांच्या मार्फत शेकडो पास १ हजार ते २००० हजार रुपयांस विकले असावेत, असा अंदाज दयानंद गावडे यांनी व्यक्त केला आहे. या टोळीचा कसून तपास चालू आहे.