शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची आज बैठक Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा व विद्वत सभा सदस्यांसाठी उद्या मंगळवार (दि. ३०) ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेमध्ये शाहू सिनेट हॉल येथे उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिसभा व विद्वत सभा सदस्यांना संसदीय कामकाज पद्धती, शिष्टाचार, परंपरा आणि संकेत तसेच सभागृहाच्या कामकाजामध्ये वापरात आणले जाणारे विविध संसदीय मार्ग, समित्यांचे कामकाज यांची ओळख व्हावी या उद्देश या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  या शिबिरात  या क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन सदस्यांना मिळणार आहे.
या मार्गदर्शनपर शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी देशमुख ‘संसदीय कामकाज पद्धती’ संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एन. जे. पवार हे भूषविणार आहेत.
शिबिरातील दुसरे सत्र  दुपारी ठीक सव्वाबारा वाजता  सुरू होईल. या सत्रामध्ये प्राचार्य नंदकुमार निकम हे ‘सभागृहातील शिष्टाचार’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. शिबिराच्या तिसऱ्या सत्रामध्ये भाऊसाहेब कांबळे सहसचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय हे ‘समिती पद्धती’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. उद्बोधन शिबिराच्या समारोपाच्या सत्रामध्ये ज्येष्ठ विचारवंत आणि संसदीय कामकाज पद्धतीसंबंधातील तज्ज्ञ डॉ. एन. डी. पाटील हे ‘संसदीय आयुधे’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
शिबाराच्या समारोप सत्राचेअध्यक्षस्थान कुलगुरू प्रा. एन. जे. पवार हे भूषवणार आहेत.या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा, विद्वत सभा, व्यवस्थापन मंडळ तसेच विविध पदव्युत्तर विभागांचे विभागप्रमुख असे सुमारे २०० व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.