वस्त्रोद्योग महासंघाच्या कार्यक्रमास बाबा, दादा उद्या एकत्र Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अजित पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दोन प्रमुख नेते उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनामा नाटय़ानंतर बुधवारी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या वतीने आयोजित वस्त्रोद्योग परिषदेच्या निमित्ताने प्रथमच एकत्रित उपस्थित राहणार आहेत. यावेळी बाबा-दादा यांची राजकीय जुगलबंदी रंगणार की राज्यातील वस्त्रोद्योगाच्या हितासाठी दोघे हातात हात घालून कार्यरत राहण्याची घोषणा करणार याकडे लक्ष वेधले आहे.महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या वतीने बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात वस्त्रोद्योग परिषद आयोजित केली आहे. परिषदेच्या अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग मंत्री महमंद अरिफखान आहेत. परिषदेला गृहमंत्री आर.आर.पाटील, अर्थमंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री राजेश टोपे, सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळंकी, वस्त्रोद्योगाचे प्रधान सचिव सुनील कोरवाल, वस्त्रोद्योग संचालक नवीन सोना उपस्थित राहणार आहेत. वस्त्रोद्योगावरील संकट, वाढलेले वीज दर, तेजी-मंदीचा फटका, कामगारांची कमतरता या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. राज्यात तांत्रिक व उत्कृष्ट सहकारी सूतगिरण्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी दिली.