‘समाजप्रबोधन आणि विचारांची बांधिलकी नष्ट होण्याच्या मार्गावर’ Print

सातारकरांतर्फे गुलाबभाईंचा सत्कार
कराड/वार्ताहर
धर्म, जातीच्या नावाखाली निर्माण झालेल्या टोळय़ांनी संपूर्ण जगच ताब्यात घेतले असून, भारतात त्याला कोणताही पक्ष अपवाद नाही. त्यामुळे समाजप्रबोधन व विचारांची बांधिलकी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती आमदार विलासकाका उंडाळकर यांनी व्यक्त केली. वैचारिक बांधिलकी जपण्याचे सामथ्र्यच आज आपल्यात राहिलेले नाही. अशा परिस्थितीत गुलाबभाई हा चालता बोलता राजदूत आहे. गुलाब नाव असूनही त्यांचे जीवन कमळाप्रमाणे फुलले असल्याचे गौरवोद्गार उंडाळकर यांनी काढले.
सातारकरांतर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते गुलाबभाई बागवान यांच्या नागरी सत्कारप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मानपत्रासह गुलाभाईंचा यथोचित नागरी सत्कार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार शिवेंद्रराजे भोसले, ज्येष्ठ विचारवंत अन्वर राजन, नगराध्यक्षा मुक्ता लेवे, डॉ. नरेंद्र दाभोलकर,अरुण गोडबोले, सुधीर धुमाळ यांची यावेळी उपस्थिती होती.  
उल्हास पवार म्हणाले की, लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम धर्मनिरपेक्ष विचारवंतांनी केले. त्यांच्या पठडीत तयार झालेल्या गुलाबभाईंनी आयुष्यभर जीवननिष्ठा जपली. त्यांनी सर्व धर्माशी संवाद जपला. त्यांचा हा आदर्श आजच्या तरुण पिढीने आचरणात आणला पाहिजे. गुलाबभाईंनी आयुष्यभर केलेल्या सत्कार्याचा हा सत्कार आहे. सातत्याने चालत राहिल्याने त्यांना माणसे भेटली. त्यातून विचारांचा संवाद साधला गेला. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन ते सर्वानाच आपले वाटतात म्हणून त्यांचा हा नागरी सत्कार होत आहे.
सत्कारास उत्तर देताना गुलाबभाई बागवान म्हणाले की, मी निष्ठावंत माणूस असून, काँग्रेस पक्ष व यशवंतराव चव्हाण यांच्यावर माझी निष्ठा आहे. त्यांच्यासोबत राहून मला अनेक चांगल्या गोष्टी शिकता आल्या. चांगल्या गोष्टीला परवानगी लागत नाही हे त्यांच्याकडून शिकलो. दुसऱ्यासाठी करीत राहा, हे खादी ग्रामोद्योगामध्ये काम करताना शिकलो. आजची तरुण पिढी बिघडत चालली असून, जुन्या माणसांचे ऐकण्यास ती फारशी तयार नाही. आगामी काळात राजकारण बाजूला ठेऊन साताऱ्यात सामाजिक एकता ठेवण्यासाठी सर्वानी साथ द्यावी.
शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुक्ता लेवे, अन्वर राजन, डॉ. दाभोलकर यांची भाषणे झाली. सत्तार शेख यांनी गुलाबभाईंवरील कविता सादर केली. विजय मांडके यांनी सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन केले. प्रास्ताविक अरुण गोडबोले यांनी केले. यावेळी बबनराव उथळे, साहेबराव पवार, हणमंतराव पवार, रफीक बागवान, प्रल्हाद चव्हाण, प्रकाश गवळी, उत्तमराव माने, गुरुप्रसाद सारडा, डॉ. अच्युत गोडबोले उपस्थित होते.