प्रबोधनकारी चळवळीचा इतिहास लिहिण्याची गरज- चौसाळकर Print

वाई/वार्ताहर
सामाजिक विषमता आणि जातीयता नष्ट करण्यासाठी सामाजिक परंपरांचा व प्रबोधनकारी चळवळीचा समग्र इतिहास लिहिण्याची आज गरज आहे असल्याचे मत समाजप्रबोधन पत्रिकेचे संपादक व राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.
दलित मित्र रा. ना. चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांचा प्रारंभ आज झाला. त्यानिमित्त रा. ना. चव्हाण व बॅ. पी. जी. पाटील सार्वजनिक वाचनालय सातारा यांच्या वतीने ब्राह्मसमाज येथे आयोजित कार्यक्रमात रा. ना. चव्हाण व महाराष्ट्रातील प्रबोधन विचार या विषयावर चौसाळकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव होते.
महात्मा फुले आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी राज्याच्या जडणघडणीसाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. या दोघांनी  हाती घेतलेल्या सामाजिक चळवळीचा व त्या पूर्वीपासूनचा समग्र इतिहास लिहिण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  चौसाळकर  पुढे म्हणाले की, म्हणाले, महाराष्ट्रातील १५० वर्षांच्या चळवळीच्या इतिहासाचा रा. ना. चव्हाण यांनी परामर्श घेतला. समाजात प्रत्यक्ष कृती करून चळवळ उभी करणारे व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपाचे कार्यकर्ते असतात. ते समाजात न मिसळता लेखणीच्या माध्यमातून काम करत असतात. रा. ना. चे साहित्य हे महाराष्ट्राचे विचारधन असून भावी पिढीला ते मार्गदर्शक आहे.
बाबा आढाव म्हणाले, रा. ना. चव्हाण यांचे साहित्य म्हणजे मागील अनेक वर्षांची बखर आहे. राज्याच्या अडचणीसाठी आणि मार्गदर्शनासाठी त्यांच्या विचारांची गरज आहे.या वेळी सतीश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश चव्हाण यांनी स्वागत केले. रवींद्र चव्हाण यांनी आभार मानले.