सोलापूरचा ‘सिद्धेश्वर’ इतरांपेक्षा २५ रुपये जादा दर देणार - काडादी Print

चाळिसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूरचा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्य़ातील अन्य साखर कारखान्यांच्या दरापेक्षा प्रतिटन उसाला २५ रुपये जादा दर देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केली.
सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चाळिसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष मेघराज काडादी यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी ऊसदराबाबत दिलासादायक घोषणा केली. मागील गळीत हंगामात कारखान्याने पहिला हप्ता १८५० रुपयांचा तर दुसरा शंभर रुपयांचा आणि तिसरा अंतिम हप्ता २२५ रुपयेप्रमाणे उसाला २१७५ रुपये दर दिला. अन्य साखर कारखाने उसाला २१५० रुपये दर देतात.
कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. गायकवाड यांनी, दुष्काळी स्थिती, ऊसदर स्पर्धा व शेतकरी संघटनांचे आंदोलन या बिकट परिस्थितीतही प्रतिदिनी सहा ते साडेसहा हजार टन ऊस गाळप करणे शक्य असल्याची ग्वाही दिली. अनावश्यक स्पर्धा टाळण्यासाठी मागील हगामासाठी आर्थिक परिस्थितीनुसार अगोदर शंभर रुपयांचा अंतिम हप्ता जाहीर केला होता. परंतु अन्य कारखान्यांनी स्पर्धेत जादा दर जाहीर केल्यामुळे आम्हीही २२५ रुपयांचा तिसरा हप्ता दिवाळीपूर्वी देणार असल्याचे काडादी यांनी घोषित केले. इतर कारखान्यांनी यापुढे जाऊन जादा दर दिल्यास सिद्धेश्वर कारखाना मागे राहणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. त्याचे उपस्थित सभासद शेतकरी व कार्यकर्त्यांनी टाळय़ांच्या गजरात स्वागत केले.
ऊसदर प्रश्नावर शेतकरी संघटना प्रत्येक कारखान्यावर जाऊन आंदोलन करीत आहेत. संघटनांनी शेतक ऱ्यांच्या सर्वागीण हितासाठी आणि कारखानदारीच्या स्थैर्यासाठी सरकारबरोबर त्यांच्या धोरणाविरुद्ध संघर्ष करणे आवश्यक असल्याचे मत काडादी यांनी व्यक्त केले.   खासगीकरण  हे सहकाराला मारक ठरत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
या वेळी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा शेकापचे माजी आमदार भाई एस. एम. पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक सिद्रामप्पा अबदुलपूरकर, माजी आमदार शिवशरण पाटील आदींची भाषणे झाली. कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, इरण्णा पाटील, मारुतीआबा पाटील, शिवण्णा बिराजदार, रेवणसिद्ध जम्मा आदी उपस्थित होते.