राजू शेट्टी यांच्या पुतळय़ाचे दहन Print

कोल्हापूर / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रसचे नेते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह पक्षाच्या मंत्र्यांवर बेभान टीका केल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन सोमवारी करण्यात आले. कुरुंदवाड शहरात झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. या वेळी खासदार शेट्टी यांच्यावर तीव्र स्वरूपाची टीका करण्यात आली.
जयसिंगपूर येथे शनिवारी झालेल्या ११व्या ऊस परिषदेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्वच वक्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले होते. शरद पवार, अजित पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. परिषदेत करण्यात आलेली टीका शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागली होती. त्यातूनच सोमवारी कुरुंदवाड येथे प्रतीकात्मक पुतळा दहनाचे आंदोलन हाती घेण्यात आले.
कुरुंदवाड नगरपालिकेजवळील चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख धनाजी जगदाळे, कुरुंदवाड नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद विलास उगळे, पठाण, रामभाऊ डांगे, चंद्रकांत पोवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मध्यवर्ती ठिकाणी जमले. खासदार शेट्टी यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले.
पुतळा दहनानंतर त्याच ठिकाणी सभा झाली. सभेत खासदार शेट्टी यांच्यावर टिकास्त्र सोडण्यात आले. खासदार शेट्टी हे ऊसदराबद्दल न बोलता वैयक्तिक आकसापोटी राष्ट्रवादी नेत्यांवर टीका करीत आहेत. शेतकऱ्यांचा कैवार घेणारे शेट्टी त्यांचा ऊस शेतातच राहावा अशी नकारात्मक भूमिका घेत आहेत. पक्षाच्या नेत्यांवर टीका करण्याचे त्यांनी थांबवले नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा या सभेत देण्यात आला.