किसन वीर कारखान्यावर शेतकऱ्यांचा मोर्चा Print

वाई/वार्ताहर
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने गेल्या अनेक वर्षांत कमी दर दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कारखान्याने शेतकरी सभासदांची फसवणूक करू नये व ठेवी परत द्याव्यात यासाठी सभासदांनी मोर्चा काढून कारखाना व्यवस्थापनास आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. ऊस उत्पादक सभासदांना सहय़ाद्री सहकारी साखर कारखाने व कृष्णा सहकारी साखर कारखान्याने उसाला जादा दर दिला आहे. या कारखान्यापेक्षा किसन वीरचा उतारा जास्त आहे. याशिवाय कारखाना तयार करत असलेल्या उपपदार्थाच्या विक्रीतून कारखान्याला अतिरिक्त उत्पादन मिळते. असे असताना कारखाना ऊस उत्पादकांची फसवणूक करून दरवर्षी २५० ते ३५० रुपये भाव कमी देत आहे. तरी कारखाना व्यवस्थापनाने चांगला दर उसाला द्यावा. कारखान्याकडे असणाऱ्या ठेवी व त्यावरील व्याजही कारखान्याने सभासदांना द्यावी अशी मागणी सभासदांनी केली. या वर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. तसेच शेतीविषयक सामग्रीचे दरही वाढले आहेत. तरी व्यवस्थापनाने सर्व बाबींचा विचार करून दर देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्त्व कारखान्याचे संचालक रतन शिंदे, माजी संचालक अरविंद चव्हाण, प्रतापराव पवार, उदय पिसाळ, विकास मांढरे, पंचायत समितीचे उपसभापती शंकरराव शिंदे, सत्यजित वीर, प्रमोद शिंदे, शशिकांत शिंदे, महादेव म्हसकर आदींनी केले.