माता, बालमृत्यू रोखण्याचे प्रयत्न आवश्यक Print

चर्चासत्रात विविध तज्ज्ञांची मागणी
सोलापूर /प्रतिनिधी
भारतातील माता व बालमृत्यूंचे प्रमाण विकसित देशांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे सामाजिक व आरोग्यदृष्टय़ा भारताची मागासलेल्या देशात गणना केली जाते. त्यासाठी शासकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांनी सामूहिकपणे प्रयत्न करून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत, असा सूर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एफपीएआय) सोलापूर शाखेने आयोजिलेल्या चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञ मंडळींनी काढला.
‘माता व बालमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना’ या विषयावर हॉटेल सूर्या येथे आयोजिलेल्या या चर्चासत्राचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर अलका राठोड होत्या. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मंजूश्री कुलकर्णी, सचिवा प्रा. डॉ. नभा काकडे, उपाध्यक्ष डॉ. मधुकर लोखंडे,   प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ. मिलिंद शहा, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी आदी उपस्थित होते.
माता व बालमृत्यू रोखण्यासाठी वयात येणाऱ्या मुलीपासून तिची काळजी  घेतली पाहिजे व तिच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत मांडताना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद शहा यांनी गर्भपातात व प्रसूतिच्या काळात घरातील पुरुष मंडळींचीही तिला मदत व सहकार्य करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. त्यासाठी कुटुंबात आरोग्यदायी वातावरण असले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर डॉ. गिरीश कुमठेकर यांनी गर्भपात प्रतिबंधक कायद्याविषयी सविस्तर माहिती देताना गर्भपाताच्या वेळी व नंतर त्या महिलेस भावनिक व मानसिक आधार देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. गर्भपात करून घ्यावयाचा की नाही, हा त्या गर्भवती महिलेचा हक्क असल्याचे त्यांनी नमूद केले.
अरविंद जोशी यांनी महिला सबलीकरणासाठी व लैंगिक हक्क जागृतीसाठी महिलांचे व बालकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याचे मत मांडले, तर सुरक्षित मातृत्व या विषयावर चर्चा उपस्थित करताना प्रा. विजया महाजन म्हणाल्या, या प्रश्नाकडे मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. कोणत्याही महिलेला मुलगाच जन्माला घालण्याचे दडपण येता कामा नये. याप्रसंगी हॅलो फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी यांनीही मनोगत मांडले.
प्रारंभी डॉ. मंजूश्री कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी चर्चासत्राचा हेतू विशद केला. शाखाधिकारी रंगनाथ जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. मधुकर लोखंडे यांनी आभार मानले.