ऊसदरासाठी कोल्हापुरात शिवसेनेची निदर्शने Print

पहिली उचल ३ हजार रुपये देण्याची मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी
चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल ३ हजार रुपये द्यावी यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी साखर उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलकांची प्रथम पोलिसांशी तर नंतर साखर उपसंचालकांशी जोरदार शाब्दिक वाद झाला. यावेळी झालेल्या चर्चेवेळी उपस्थित राहण्यास पत्रकारांना मज्जाव केला. मात्र पत्रकारांना उपस्थित ठेवल्याशिवाय चर्चा करणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी दिलगिरी व्यक्त करीत पत्रकारांना हजर राहण्यास परवानगी दिली. मंत्री समितीने साखर कारखान्यांना साखर व उपपदार्थांच्या आधारे किती रकमेचा अंतिम दर देता येतो याची माहिती देण्यास कळविले आहे. त्यानुसार माहिती संकलनाचे काम सुरू झाले असल्याचे यावेळी साखर उपसंचालक यू.व्ही.सुर्वे यांनी सांगितले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत सोमवारी शिवसेनेचे संपर्क नेते आमदार अरूण दुधवाडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथील साखर उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यंदाच्या हंगामासाठी पहिली उचल ३ हजार रुपये मिळावी, एकूण भाव ३ हजार ५०० रुपये मिळावी आणि गतहंगामातील ५०० रुपये द्यावेत या मुख्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
भगवे झेंडे घेतलेले शिवसैनिक मागण्यांची जोरदार घोषणाबाजी करीत होते. या कार्यालयामध्ये मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बैठकीच्या वेळी मोडतोडीचा प्रकार केला होता. याची दखल घेऊन आज या कार्यालयासमोर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी.डी.पोमण व आंदोलक यांच्यात शाब्दिक वादावाद झाली.
पोलिसांनी बैठकीसाठी पत्रकारांना प्रवेश नाकारला, ही माहिती समजल्यावर जिल्हाप्रमुख देवणे यांनी पत्रकारांशिवाय बैठक सुरू होणार नाही, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी नमते घेत पत्रकारांना बैठकीसाठी पाचारण केले. त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मागण्यांचे निवेदन साखर उपसंचालक यू.व्ही.सुर्वे यांना दिले. सुर्वे यांच्याशी चर्चा सुरू असताना काही मुद्दय़ांवरून शाब्दिक वाद रंगत गेला. आंदोलकांच्या मागण्या मुख्यमंत्री, सहकारमंत्री व साखर आयुक्त यांना कळविण्याचे आश्वासन सुर्वे यांनी दिले. या आंदोलनात मधुकर पाटील, शाहूवाडी तालुका प्रमुख दत्तात्रय पवार, पन्हाळा तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील, महिला आघाडी संघटक शुभांगी साळोखे, हातकणंगले तालुका प्रमुख साताप्पा पवार, इचलकरंजी शहर प्रमुख धनाजी मोरे, भैय्याजी चव्हाण, अण्णा भिलोरे यांचा सहभाग होता.