मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानिमित्ताने आघाडी शासनातील मानापमान उफाळला Print

विजय पाटील , कराड ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांच्याच कर्मभूमीतील कराडच्या कृष्णा नदीवरील नवीन पुलाच्या झालेल्या उद्घाटन कार्यक्रमावर निमंत्रण पत्रिकेवरील १४ पैकी राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींसह ९ मान्यवरांनी बहिष्कार टाकल्याने राज्यातील आघाडी सरकारमधील मुंबई, दिल्लीतील भांडण आता नेते मंडळींच्या गावपातळीवर अगदी गल्लीबोळात पोचल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडमधील कार्यक्रमातच आघाडीअंतर्गत कलह विकोपाला गेल्याचा प्रत्यय आल्याने अवघ्या महाराष्ट्राभर ही राजकीय धुमश्चक्री रंगणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कृष्णा पुलाच्या उद्घाटनासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेला व सदर कार्यक्रमाच्या नियोजनात या पुलासाठी प्रदीर्घ काळापासून प्रयत्न करणारे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलल्याच्या भावनेतून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी नियोजित उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच पुलाचे उद्घाटन करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. खरे पाहता उद्घाटन सोहळय़ाची माहिती दिल्या गेलेल्या पत्रकार परिषदेला या पुलासाठी पाठपुरावा करणारे माजी खासदार श्रीनिवास पाटील व आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित असणे क्रमप्राप्त होते. परंतु ते उपस्थित नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या गटाने संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतलेली पत्रकार बैठक उतावळीपणाचीच म्हणावी लागणार आहे. दुसरीकडे मात्र, या पत्रकार बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून दसऱ्याच्या मुहूर्तावरील शासकीय कार्यक्रमापूर्वीच पुलाच्या उद्घाटनाचा प्रकारही उतावळेपणाचाच ठरला आहे. या एकंदर उतावळेपणावर दोन्ही काँग्रेसकडून खुलासा देण्यात आला. त्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. परंतु, या पुलासाठी ज्यांनी सतत प्रयत्न केले त्यांना जाणीवपूर्वक विश्वासात न घेता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याला आम्ही विरोध केला असल्याची भूमिका वादावादीत मागे न हटणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली आहे. दरम्यान, काँग्रेसकडूनही करण्यात आलेल्या खुलाशात पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शासकीय आहे. त्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असताना राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी केलेला उद्घाटनाचा फार्स हास्यास्पद असल्याचा निर्वाळा दिला आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृष्णा पुलाचे उद्घाटन होताना, या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचा बहिष्कारच राहिल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची भूमिका वरिष्ठांच्या सांगण्यावरूनच निश्चित झाल्याचे म्हणावे लागत आहे.   पुलासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा नियोजनाच्या प्रक्रियेत समावेश न करून घेतल्याचा स्थानिक काँग्रेसजनांचा   मनमानीपणा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सदर कार्यक्रमाच्या  व्यासपीठावरून ठणकावून सांगायला हवा होता. मात्र, तसे न घडता यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांत या लोकनेत्याच्या आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या कर्मभूमीतच महाराष्ट्रातील आघाडी मित्रपक्षातील मानापमान आणि मनमानीचा लाजीरवाणा प्रकार घडून गेला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते पार पडलेल्या नवीन कृष्णा पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विलासकाका उंडाळकर हेही अनुपस्थित राहिले. येनकेन कारणाने कार्यक्रमाचे अध्यक्ष, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही अनुपस्थिती दर्शवली. तर निमंत्रण पत्रिकेवरील पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री रामराजे निंबाळकर, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमालाच अनुपस्थिती दर्शवत जणू बहिष्कार टाकल्याचे चित्र उद्घाटन कार्यक्रमापेक्षाही जोरदार चर्चेत राहिले.  
गटबाजीचे राजकारण जुनेच
गेल्या सुमारे पाच वर्षांपूर्वी केंद्रातील पुरोगामी आघाडी सरकारमधील घटक पक्ष ‘राजद’ चे सर्वेसर्वा तथा तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव व राष्ट्रवादीचे नेते नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांचे सकाळच्या प्रहरी कराडच्या विमानतळावर आगमन झाले. येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या उंडाळकर गटाने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींनी उभय राष्ट्रीय नेत्यांचे जंगी स्वागत केले. परंतु, पंतप्रधान कार्यालायाचा विशेष कारभार सांभाळणारे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटातील कोणीही इकडे न फिरकल्याने काँग्रेस अंतर्गत गटबाजीचे दर्शन घडले होते.दरम्यान, अनेक कार्यक्रमांवरून राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गतही राजकारण नित्याचे झाले असून, आता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्येही मानापमान आणि श्रेयवादावरून डाव रंगू लागला आहे.