सोलापुरात न्यायाधीशांचा बंगला फोडण्याचा प्रयत्न Print

सोलापूर /प्रतिनिधी
शहरात पोलीस आयुक्तांच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश कल्पना व्होरे यांच्या बंगल्यात चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस आयुक्तांच्या बंगल्याच्या पाठीमागे जिल्हा न्यायाधीशांसह अन्य न्यायाधीशांची निवासस्थाने आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांच्या बंगल्यात साफसफाई करणारा बाबूल शेख न्यायाधीश औटी यांच्या बंगल्याची साफसफाई करून शेजारच्या न्यायाधीश कल्पना व्होरे यांच्या निवासस्थानी गेला असता तेथून चोरटा पळून जाताना दिसला. दरवाजाची कडी तोडून चोरटय़ाने आत प्रवेश करून कपाटाचा दरवाजाही उचकटून चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. न्यायाधीश व्होरे व त्यांचे कुटुंबीय चार दिवसांपासून परगावी आहेत. त्याची संधी साधून चोरटय़ाने त्यांच्या बंगल्यात चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेख याने बंगल्यात प्रवेश केल्याची चाहूल लागताच चोरटय़ाने धूम ठोकली.