कराड अर्बन बँकेने योग शिबिराचा नवा पायंडा पाडला - डॉ. गुंडे Print

कराड/वार्ताहर
कराड अर्बन बँकेने सेवकांसाठी योग शिबिराचे आयोजन करून नवा पायंडा पाडला असून, सेवक वर्ग आनंदी व निरोगी राहिले, तर संस्था सुद्धा प्रगतिपथावर जात असल्याचे कोल्हापूरच्या जी. जे. जी. योग अ‍ॅकॅडमीचे संस्थापक डॉ. धनंजय गुंडे यांनी सांगितले.
कराड अर्बन बँक स्पोर्ट्स क्लबच्या वतीने बँकेतील सेवकांसाठी आयोजित केलेल्या योग शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष राजीव आहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, प्रशासन विभागप्रमुख माधव माने, स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष दिलीप चिंचकर यांच्यासह बँकेचे संचालक, सेवक या वेळी उपस्थित होते. या वेळी कराड अर्बनच्या सेवकांसाठी आठ शिबिरे घेणाऱ्या डॉ. धनंजय गुंडे यांचा सुभाषराव जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. धनंजय गुंडे म्हणाले, आनंदी जीवन जगण्यासाठी योगाची गरज असून, त्याकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. निरोगी राहण्यासाठी चांगले वागणाऱ्यांशी चांगले वागा आणि आपणाशी वाईट वागणाऱ्यांशीही चांगले वागा. तसेच आपले राहणीमान चांगले ठेवण्याबरोबर आपल्या राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे आणि मानवी संबंध निरोगी ठेवले पाहिजे.
जीवनातील ताणतणाव हा मानव जातीचा शत्रू असून, त्यामुळे हृदयविकार व मधुमेहासारखे रोग वाढत आहेत. त्यामुळे शरीर व मनाची एकाग्रता ठेवून कृती करा त्यातून जीवनात आनंद निर्माण होऊ शकेल. नेहमी आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.
 दिलीप गुरव म्हणाले, की बँकेतील सेवकांमध्ये काम करताना उत्साह राहावा. तसेच त्यांचे आरोग्य उत्तम राहण्याच्या उद्देशाने डॉ.  गुंडे यांच्या योगशिबिराचे आयोजन केले असून, सेवकांनी त्याचा लाभ घ्यावा. आचार, आहार व विहार यातून योगोपचार केल्यास आपले जीवन चांगल्या प्रकारे घडेल. यासाठी सेवकांनी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावा. जगदीश त्रिवेदी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.