महागाई भत्तावाढीसाठी जि. प. कर्मचाऱ्यांची निदर्शने Print

सोलापूर /प्रतिनिधी
केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्त्यात वाढ करावी या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली, तर लिपीकवर्गीय संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.
केंद्र सरकारने गेल्या १ जुलैपासून महागाई भत्त्यात सात टक्के वाढ केली आहे. त्याप्रमाणे राज्य सरकारनेही राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्यावा म्हणून कर्मचारी संघटनांनी शासनाकडे मागणी केली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही भेटून निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे पडसाद उमटले आहेत. महागाई भत्त्यात वाढ केली तर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात जाईल, असे म. वा. ओंकारप्रणीत राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी सांगितले. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणे भाग पडल्याचे त्यांनी नमूद केले.
या आंदोलनात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक व विवेक लिंगराज यांच्यासह संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कस्तुरे, राज्य कोषाध्यक्ष बी. टी. मोहिते, अभियंता संघटनेचे पंडित भोसले, लेखा कर्मचारी संघटनेचे एम. एस. क्षीरसागर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटनेचे शिवानंद भरले, कास्ट्राईब जि. प.कर्मचारी संघटनेचे अरुण क्षीरसागर, मैल मजूर संघटनेचे जाफर शेख, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे सूर्यकांत गायकवाड, स्टेनो संघटनेचे बी. डी. साठे, महिला कर्मचारी संघटनेच्या उमादेवी पंढरी, पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेचे डॉ. एस. पी. माने आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.