शेतकरी संघटनेची साखर कारखान्यांवर दुचाकी रॅली Print

गळीत हंगाम न करण्याचा इशारा
कोल्हापूर / प्रतिनिधी    
उसाला पहिला हप्ता ३ हजार रुपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्यांवर बुधवारी भव्य दुचाकी रॅली काढली होती. कारखान्याच्या व्यवस्थापनाला मागणीचे निवेदन सादर केले. त्याची पूर्तता न केल्यास गळीत हंगाम सुरू करू दिला जाणार नाही, असा इशारा दिला.     
जयसिंगपूर येथे गेल्या आठवडय़ात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी ऊस परिषद पार पडली. त्यामध्ये उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये द्यावा, गत हंगामातील ५०० रुपये मिळावे आदी १२ मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले. साखर कारखान्यांकडून हा दर मिळवून घेतल्याशिवाय स्वस्त बसायचे नाही, असा निर्धार परिषदेत करण्यात आला होता.    
परिषदेतील निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हालचारी सुरू करण्यात आल्या आहेत.
काल सीमाभागातील साखर कारखान्यांवर (कर्नाटक) दुचाकी रॅली काढण्यात आली होती. तर आज हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्यांवर रॅली काढण्यात आली. कुरुंदवाड येथील सन्मित्र चौकातून रॅलीला सुरुवात झाली. ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब जोग यांच्या हस्ते रॅलीला सुरुवात झाली.
शिरोळ तालुक्यातील दत्त, गुरुदत्त तसेच हातकणंगले तालुक्यातील जवाहर, पंचगंगा, शरद तसेच वारणा साखर कारखान्यावर ही दुचाकी रॅली गेली. यामध्ये शेकडो कार्यकर्ते स्वाभिमानीचा झेंडा घेऊन घोषणा देत सहभागी झाले होते. संबंधित कारखान्यांच्या व्यवस्थापनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याची पूर्तता न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.    
दुचाकी रॅलीचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सावकर मादनाईक, पी. आर. चव्हाण, विठ्ठल मोरे, अण्णासाहेब चौगुले, आदिनाथ हेमगिरे, सुभाष शेट्टी आदींनी केले.