गडकरी यांची खुशाल चौकशी करावी- वरुण गांधी Print

सोलापूर /प्रतिनिधी
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सामान्य शेतक ऱ्यांचे हित जोपासत काम चालविले असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले जात आहेत. गडकरी हे प्रामाणिकच असून ते कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहेत. सरकारने त्यांची खुशाल चौकशी करावी, अशी मल्लिनाथी भाजपचे तरुण खासदार वरुण गांधी यांनी केली.
सोलापूरच्या विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना वरुण गांधी यांनी, गडकरी यांच्यावर केवळ राजकीय हेतूने आरोप होत असून या संदर्भात अरविंद केजरीवाल हे राजकारणासाठी बोलत असल्यामुळे त्यांची विश्वासार्हता संपली, असे मत व्यक्त केले. गडकरी यांच्यावरील आरोपांची सरकारकडून निष्पक्ष चौकशी कशी होणार, हे सर्वाना ज्ञात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
ते म्हणाले, यापूर्वी आम्ही अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. अण्णा व केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आणली होती. परंतु केजरीवाल यांनी अण्णांना सोडून राजकीय पक्षाची स्थापना केल्यामुळे त्यांची लढाई आता सामाजिक नव्हे तर राजकीय स्वरूपाची झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तथापि, गडकरी यांनी आपल्यावर आरोप होताच चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली व तशी मागणीही केली. यावरून त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो, असा निर्वाळाही खासदार वरुण गांधी यांनी दिला. अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपामध्ये अभावानेच घराणेशाही असल्याचा दावाही त्यांनी केला.