सोलापूरच्या कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न; दुसऱ्याने टीव्ही फोडला Print

सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूरच्या जिल्हा कारागृहात एका कच्च्या कैद्याने आत्महत्येचा तर दुसऱ्या कैद्याने आपणास कारागृहाबाहेर सोडले जाऊ नये म्हणून त्रागा करीत कारागृहातील दूरचित्रवाणी संच फोडला. या दोन्ही घटनांची दखल घेत प्रशासनाच्या वतीने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, पंढरपूर शहरातील एका गुन्ह्य़ात सागर धोंडिबा पवार हा सोलापूरच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
तीन क्रमांकाच्या बराकीत त्याला ठेवण्यात आले होते. त्याने रात्री बराकीतील स्वच्छतागृहात जाऊन तेथील फरशी फोडली आणि त्या फरशीच्या तुकडय़ाने स्वत:च्या शरीरावर मारून घेतले. यात दोन्ही हात, मनगट, पायाच्या टाचांवर जखम झाली.
त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येताच कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पवार यास ठेवण्यात आलेल्या बराकीत धाव घेतली. याप्रकरणी कर्मचाऱ्यांपैकी तानाजी गायकवाड यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
दरम्यान, याच कारागृहात अन्य दुसऱ्या घटनेत बराक क्रमांक ५ मध्ये राहणाऱ्या व्यंकटेश यल्लप्पा बंदगी याने कारागृहात सकाळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी भेट दिली असता, मला जामीन देऊ नका, कारागृहाच्या बाहेर माझ्या जीवाला धोका आहे, असे ओरडत गोंधळ घातला. त्याकडे दुर्लक्ष झाले. तेव्हा रागातच त्याने कारागृहात कैद्यांसाठी करमणुकीचे साधन म्हणून ठेवण्यात आलेला दूरचित्रवाणी संच फोडला. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदगी यास न्यायालय परिसरात वकिलांच्या मोटारीच्या काचा फोडताना पकडण्यात आले होते.