शिवसेनेच्या वतीने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको Print

उसाला पहिली उचल ३ हजार देण्याची मागणी
कोल्हापूर / प्रतिनिधी    
चालू गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल ३ हजार रुपये द्यावी, या मागणीसाठी कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. शिवसैनिक घोषणा देत आंदोलन करीत राहिल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अर्धा तासाहून अधिक काळ विस्कळीत झाली होती. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी अटक करून नंतर सुटका केली.     
ऊस गळीत हंगाम सुरू होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या अंतर्गत बुधवारी राष्ट्रीय महामार्गावरील कागल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी शिवसैनिक व शेतकरी एकत्रित जमले. त्यांनी पहिली उचल ३ हजार व अंतिम दर ३ हजार ५०० रुपये द्यावा, गत हंगामातील ५०० रुपयांचा हप्ता दिल्याशिवाय गाळपाला परवानगी देऊ नये, राज्य सहकारी बँकेने साखरेच्या पहिल्या उचलीसाठी ९० टक्के रक्कम द्यावी, गैरव्यवहार करणाऱ्या साखर कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांच्या घोषणा देण्यात येत होत्या. ३ हजार रुपयांची उचल जाहीर होत नाही, तोपर्यंत ऊसतोड करू दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.
उपस्थित अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अर्धा तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. अखेर पोलिसांनी जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, कागल तालुका प्रमुख अशोक पाटील, जिल्हा महिला संघटक सुषमा चव्हाण, तालुका महिला संघटक विद्या गिरी यांच्यासह शिवसैनिकांना अटक करण्यात आली.    

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामासाठी पहिली उचल ३ हजार रुपये मिळावी या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संभाजी भोकरे, अशोक पाटील, सुषमा चव्हाण, विद्या गिरी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करणारे कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली.