सोलापूर जिल्ह्य़ात ऊस आंदोलन पेटले Print

सोलापूर /प्रतिनिधी
यंदाच्या गळीत हंगामात ऊसदर जाहीर करावा आणि मागणीप्रमाणे ऊसदर मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी सोलापूर जिल्ह्य़ात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडले आहे. यात प्रामुख्याने ऊस वाहतुकीच्या वाहनांना लक्ष्य केले जात असून वाहनांचे टायर फोडणे, ऊस वाहतूक रोखणे आणि गाळप बंद पाडणे यासारखे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, या आंदोलनाचा फटका बसल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याचे गाळप व्यवस्थापनानेच बंद ठेवले आहे. या आंदोलनाचे पडसाद प्रामुख्याने माढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा आदी भागात प्रकर्षांने उमटत आहेत. माढा तालुक्यातील म्हैसगाव येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांच्या विठ्ठल शुगर या खासगी साखर कारखान्यासाठी ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या ६४ रिकाम्या बैलगाडय़ांचे १२८ टायर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी फोडले. यात सुमारे साडेसात लाखांचे नुकसान झाले असून साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने याप्रकरणी संघटनेच्या सहा पदाधिकाऱ्यांविरुध्द कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याच तालुक्यात आमदार बबनराव शिंदे यांच्या पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
करमाळा तालुक्यात महेश चिवटे व विवेक येवले यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या तालुक्यात तीन साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद पाडण्याचा चंग बांधण्यात आला आहे. तर माळशिरस तालुक्यात अकलूजच्या सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वाहनांचेही नुकसान करण्यात आले. माळशिरस,पंढरपूर भागात पोलीस संरक्षणात ऊस वाहतूक सुरू असली तरी त्या भागात तणावाचे वातावरण दिसून येते. पंढरपूर तालुक्यात खर्डी येथे सीताराम महाराज साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असता ऊसदराच्या प्रश्नावर त्यांच्या दिशेने चप्पल फेकण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्यांने केला होता.