घोटाळा व कचरा समस्येवरून कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभेत वादंग Print

कोल्हापूर / प्रतिनिधी, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

पार्किंग घोटाळ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, वाढत्या कचऱ्यामुळे नागरिकांचे धोक्यात आलेले आरोग्य या विषयावर कोल्हापूर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जोरदार वादावादी झाली. पार्किंग घोटाळ्यावरून प्रकाश नाईकनवरे व भूपाल शेटे यांच्यातील शाब्दिक वाद रंगला होता. तर नगरसेविका सरस्वती पोवार यांनी भागातील कचऱ्याचे ढीग असणाऱ्या फोटोचा फलक सभागृहात दाखवत आरोग्य विभागाचे धिंडवडे काढले. सभेच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर दिगंबर फराकटे होते.    शहरामध्ये पार्किंगच्या बनावट पावत्या करून गैरव्यवहार होत असल्याचा प्रकार चर्चेत आहे. या विषयी काही नगरसेवकांनी जाहीर विधानही केले होते. मात्र प्रशासनाने त्याची काहीच दखल घेतली. या विषयाचे पडसाद आजच्या सर्वसाधारण सभेवेळी उमटले. जयंत पाटील यांनी हा विषय उपस्थित केला. पार्किंगच्या बनावट पावत्या आढळून आल्यानंतर त्याची चर्चा झाली. तरीही प्रशासनाने संबंधितांवर गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.    
त्यावर गुन्हा कोणी नोंद करायचा यावरून चर्चा रंगत गेली. हा गुन्हा उपआयुक्तांनी दाखल करायचा की संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यावरून वेगवेगळी मते व्यक्त करण्यात आली. त्यावर सभेचे अध्यक्ष फराकटे उपआयुक्तांनी हा गुन्हा दाखल करावा, असा आदेश दिला.    
पार्किंगच्या विषयावर चर्चा सुरू असताना प्रकाश नाईकनवरे, भूपाल शेटे यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. शेटे म्हणाले, पार्किंग पावत्यांमध्ये गैरव्यवहार झाले असल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. त्याबाबत माझे चुकले असेल तर राजीनामा देण्याची तयारी आहे. त्यावर राजू लाटकर म्हणाले, नगरसेवक एखादा घोटाळा उघडकीस आणतात. पण प्रशासन त्याची दखल घेत नाही. नगरसेवकांना घोटाळा होत असल्याचे दिसून येते मग प्रशासन काय करीत असते असे म्हणत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीकेची झोड उठविली. प्रकाश नाईकनवरे यांनी पार्किंगबाबत सादर करण्यात आलेल्या पावत्या बनावट कशा आहेत, अशी विचारणा केली. त्यातून वाद वाढत गेला. जयंत पाटील यांनी महापालिकेचे हित होत असेल तर सर्व नगरसेवकांनी एकत्रित येऊन अशा प्रकाराला पाठबळ द्यावे, असे म्हणत वादावर पडदा टाकला.     
कोल्हापूर शहरामध्ये कचऱ्याचे वाढते प्रमाण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यावर आजच्या सभेत अनेक नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. सरस्वती पोवार यांनी त्यांच्या प्रभाग क्र.१८ ई कनाननगरमधील भागात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांचे फोटो काढलेले फलक सभागृहात सादर केले. वाढत्या कचऱ्यामुळे प्रभागात काविळ, हिवताप, डेंग्यू, मलेरिया साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव वाढल्याचे त्यांनी दाखवून दिले. प्रभागातील नागरिकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, याविषयी त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत चंद्रकांत घाटगे, महेश जाधव, जयश्री सोनवणे, लीला धुमाळ यांनीही आरोग्य विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. आरोग्य विभागाचा कारभार पूर्णत ढेपाळला असून प्रशासनाचा वचक हरविला आहे, अशी टीका करीत या नगरसेवकांनी कारभारात त्वरित सुधारणा करावी, अशी मागणी केली.