ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे ठराव मंजूर Print

शेतकरी संघटनेची सांगलीत ऊस परिषद
कोल्हापूर / प्रतिनिधी    
उसाची उपलब्धता खूपच कमी प्रमाणात असलेल्या पुणे व अहमदनगर जिल्हय़ासाठी उसाची पहिली उचल ३ हजार १०० रुपये द्यावी आणि उर्वरित जिल्हय़ांसाठी २ हजार ९०० रुपये पहिली उचल मिळावी, अशी मागणी बुधवारी सांगली येथे झालेल्या ऊस परिषदेत शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवि देवांग यांनी केली. परिषदेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे ठराव मंजूर करण्यात आले.     
सांगली येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहामध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी राज्यव्यापी ऊस परिषद आयोजित केली होती. या परिषदेत शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. परिषदेत बोलताना रवी देवांग यांनी साखर उद्योगातील घडामोडींचा आढावा घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक कशी होते याची माहिती दिली. ते म्हणाले, ऊस उत्पादन जादा प्रमाणात होते तेव्हा शेतकऱ्यांना कमी दर देऊन साखर कारखानदार त्यांची कोंडी करतात. या वेळी ऊस कमी असल्याने शेतकरी साखर कारखानदारांची अडचण करू शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी कोणाच्या दावणीला बांधले न जाता एकजूट होऊन संघर्ष करण्यासाठी तयार असले पाहिजे.     
साखर उद्योग नियंत्रण मुक्त झाला पाहिजे, अशी मागणी करून देवांग यांनी त्याचे कसे फायदे होणार आहेत, याचे स्पष्टीकरण केले. गत हंगामात बऱ्याचशा साखर कारखान्यांनी दुसरी उचल दिलेली नाही.  सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मध्यस्थी केली होती. त्यांनीच ही उचल देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अन्यथा असे कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा देण्यात आला.     
वामनराव तटप म्हणाले, साखर कारखानदारांकडे ऊस व उपपदार्थाचा मोठा पैसा शिल्लक आहे. तो शेतकऱ्यांनी संघटित शक्तीच्या जोरावर मिळविण्यासाठी लढत राहिले पाहिजे. शासन उसाच्या उत्पादनाचा खर्च गृहीत धरताना ५३ टक्के किंमत कमी धरते. १०० रुपये खर्च असला की प्रत्यक्षात ४७रुपये नोंदविले जातात. यामुळे शेतकऱ्याला योग्य दर न मिळाल्याने तो कर्जबाजारी झाला आहे. या परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर ते काँग्रेसधार्जिणे असल्याचा आरोप करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये स्वाभिमानीचे सदस्य काँग्रेसच्या सदस्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. उसाचा दर मागताना ते काँग्रेसच्या नेत्यांविषयी काही बोलत नाहीत. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खा.शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे  नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला. अनिल घटवट, संजय कोल्हे, अनिल चव्हाण, आबा ताकवले, उज्ज्वला नरंदे यांची भाषणे झाली.