कोल्हापुरातील झूम प्रकल्पाची अधिकाऱ्यांकडून पाहणी Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
कसबा बावडय़ातील झूम प्रकल्पातील कचऱ्याच्या प्रश्नामुळे सध्या जिल्हा प्रशासन, राजकीय नेत्यांवर ताशेरे ओढले जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी प्रदूषण मंडळ व महापालिका आरोग्य विभागासह झूम प्रकल्पाची पाहणी केली. झूम प्रकल्पातील कचऱ्याचा उठाव करण्यासाठी निविदा प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ दिवसात कचरा उठावाचे काम सुरु  होईल, असे माने यांनी सांगितले .
शहरात दररोज १६५ टन कचरा तयार होतो. तो कचरा कसबा बावडय़ातील झूम प्रकल्पात टाकण्यात येत होता.
दोन वर्षांपासून कचरा टाकण्याचे काम बंद आहे. परंतु यापूर्वी टाकण्यात आलेले कचऱ्याचे ढीग कुजल्याने निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न वाढला आहे.गेल्या पाच वर्षांपासून घनकचऱ्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावत असल्याचा आरोप महापालिकेवर करण्यात येत आहे.
 जिल्हाधिकाऱ्यांनी  या झूम प्रकल्पाची पाहणी करून प्रदूषण मंडळ व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. घनकचरा आता कसबा बावडा येथील सरवळ इथे टाकण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी माने यांनी टोपखणीची पाहणी केली.  
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विद्यापीठाची शेंडापार्क येथील ३५० एकर पडीक जमीन सांडपाणी लिफ्टिंगकडून ओलिताखाली आणण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस असल्याचे सांगितले.