आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यअहवालाचे उद्या प्रकाशन Print

सोलापूर /प्रतिनिधी
विधान परिषदेतील पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या चार वर्षांच्या विधिमंडळातील कार्याचा अहवाल येत्या शनिवारी, ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष, आमदार विजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवस्मारक सभागृहात आयोजिलेल्या या समारंभात आमदार विनोद तावडे यांच्या हस्ते व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रघुनाथ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्याचा अहवाल प्रकाशित करण्यात येणार आहे.
आमदार पाटील यांनी विधान परिषदेत तसेच मंत्रालयात विविध मंत्र्यांच्या कार्यालयात पदवीधर व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. पाठपुरावा करून अनेक न्याय्य प्रश्नांची सोडवणूकही केली आहे.
तत्पूर्वी, आमदार पाटील यांनी शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न समजून घेण्यासाठी पुणे मतदारसंघात गावोगावी दौरे केले असून यात कायम अनुदानित शाळा-महाविद्यालयांतील त्रुटी तसेच विविध संस्थांची २००३ पासून बंद असलेले वेतनेतर अनुदान पूर्ववत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
पदवीधर बेकार तरुणांना एक तर नोकरी द्या किंवा सक्षम रोजगार भत्ता दिला पाहिजे यासाठी यापुढील काळातही प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस पक्षाचे शहर सरचिटणीस प्रा.अशोक निंबर्गी, दत्तात्रेय गणपा, विक्रम देशमुख आदी उपस्थित होते.