संशयित चोरटय़ाकडून चार गुन्हे उघडकीस Print

सोलापूर /प्रतिनिधी
शहरात घरफोडी व चोरी करणाऱ्या एका संशयितास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून दीड लाखांचा चोरीचा ऐवज हस्तगत केला. हरजितसिंग सिसपालसिंग टाक (२२, रा. हनुमाननगर, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
दत्तात्रेय रामचंद्र कुलकर्णी (रा. मानस अपार्टमेंट, सदर बझार) यांची घरफोडी झाली होती. तसेच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीची मोटारसायकलही चोरटय़ांनी पळवून नेली होती. तर संतोष युवराज सुर्वे  यांच्या पत्नीला गांधीनगरात लुटण्यात आले होते. तसेच, विजापूर रस्त्यावर सैफुल भागात अज्ञात चोरटय़ांनी तिप्पण्णा दुनाळे यांची घरफोडी करून सोन्याचे दागिने लांबविले. दमाणीनगरात विक्रम कलशेट्टी यांचीही घरफोडी झाली होती. या गुन्ह्य़ांचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असता यात संशयित म्हणून हरजितसिंग टाक यास ताब्यात घेण्यात आले. त्याने चार गुन्ह्य़ांची कबुली दिली व दीड लाखांचा ऐवज पोलिसांच्या हवाली केला. सहायक पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.