तिसरी भारतीय छात्र संसद जानेवारीत Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
‘तिसरी भारतीय छात्र संसद’ १० ते १२ जानेवारी दरम्यान माईर्स एमआयटी पुणे येथे आयोजित केल्याची माहिती संचालक प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय छात्र संसदेत  देशभरातून  २८ राज्यांतील ४०० विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील सुमारे १२ ते १५ हजार विद्यार्थी उपस्थित राहतील. तसेच महाविद्यालयांचे ‘विद्यार्थी संसदेचे प्रतिनिधी’ संसदेत सहभागी  होतील.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, डॉ. महंमद युनुस, एम. जे. अकबर, अनुपम खेर, प्रकाश झा, शबाना आझमी, अँड. उज्ज्वल निकम, लक्ष्मी मित्तल, खासदार राजू शेट्टी, राहुल द्रविड आदींचा समावेश आहे. संस्थेच्या अ‍ॅकॅडमिक कौन्सिलचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मश्री डॉ. विजय भटकर, टी. एन. शेषन, तुषार गांधी, अँड. भास्करराव आव्हाड यांचा या उपक्रमास आधार आहे,
भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युनोस्को अध्यासन, विश्वशांती केंद्र (आळंदी), राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली ही संसद भरविली जाते.
ही संसद ३ दिवसांत ८ सत्रात विभागली आहे. राजकारणामध्ये चांगले युवक यावेत व राजकारणाचे शुद्धीकरण व्हावे, लोकशाही सुदृढ करणे, देशाला चांगले नेतृत्व, चांगले प्रशासन व चांगले शासन निर्माण व्हावे. तरुण विद्यार्थी नेत्यांना एक समान व्यासपीठ निर्माण करणे. विविध क्षेत्रातील प्रभावशाली नेत्यांशी प्रश्नोत्तररूपाने संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे, प्रादेशिक, राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील समस्याबाबत प्रतिनिधींनी विचार करावा, त्यासाठी त्यांना जागृत करणे असे विविध उद्देशाने या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येते. या संसदेत विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या पत्रकार परिषदेत जनसंपर्क अधिकारी आर. टी. रुईकर, अविनाश बेडेकर उपस्थित होते.