वीज दरवाढीच्या निषेधार्थ दलित महासंघाची निदर्शने Print

कराड / वार्ताहर
वीज वितरण कंपनीने नव्याने इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवल्यामुळे वीज बिलात प्रचंड वाढ झाल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने वीज कंपनीच्या येथील दत्त चौकातील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर मागणीचे निवेदन शाखा अभियंत्यांना देण्यात आले.
दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष जावेद नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात साजीद पटेल, लतीफ शेख, हरिश बल्लाळ, राहुल भिसे, गजानन कुंभार, मुबारक नदाफ, ताराबाई काळे, जायदा शेख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
निवेदनात म्हटले आहे, की महागाईमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी, नागरिक हैराण झाले आहेत. अशातच वीज कंपनीने नव्याने इलेक्ट्रॉनिक मीटर बसवल्यामुळे वीज बिलात भरमसाठ वाढ झाली आहे.
पूर्वीच्या वीज मीटरचा फोटो येत असल्यामुळे अचूक रिडिंग किती झाले, हे समजत होते. मात्र, नव्याने बसवलेल्या मीटरमध्ये युनिट किती वापरले हे समजत नाही. परिणामी भरमसाठ वीज बिले येऊ लागली आहेत. हे मीटर सदोष असल्यामुळे ते बंद करून पूर्वीचे मीटर बसवण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी केली आहे. तसेच मीटर वापराप्रमाणे वीज बिले दुरुस्त करून द्यावीत, वीज बिले भरण्यासाठी ग्राहकांना तगादा लावू नये अथवा वीज कनेक्शन तोडू नये अशा मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.