दृक्-श्राव्य माध्यमांद्वारे गुणवत्तेचे शिक्षण देण्याची गरज-डॉ. निगवेकर Print

सोलापूर /प्रतिनिधी
जगात माहिती व तंत्रज्ञानाचा महास्फोट होत असताना काळाची पावले ओळखून देशात मौखिक शिक्षण न देता दृक्-श्राव्य माध्यमांचा वापर करून गुणवत्तेचे शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण निगवेकर यांनी केले.
सोलापूर विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ गुरुवारी संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या समारंभात डॉ. निगवेकर यांच्या हस्ते २५ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीसह एकूण ७,३९४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यातील २१४१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समारंभास हजर राहून पदवीचा स्वीकार केला. तसेच आठ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित केले. विद्यापीठाच्या प्रांगणात झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर हे होते.
डॉ. निगवेकर यांनी संदेश दळणवळण, संप्रेक्षण आणि संगणक या तिन्ही अद्ययावत साधनांचा उपयोग शिक्षणासाठी होणे गरजेचे असल्याचे नमूद करताना डॉ. निगवेकर म्हणाले, गुणवत्तेचे शिक्षण देणारी राष्ट्रेच प्रगतिपथावर जातात. ज्या देशात ब्रॉडबॅन्डसेवा तळागाळापर्यंत पसरली आहे, ते देश प्रगत म्हणून ओखळले जातात. आपल्या देशात ब्रॉडबॅन्डचा वापराचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी  सांगितले.  विद्यापीठांना शासन पुरेसा निधी देत नाही. वेतनासाठी आपण मोठय़ा प्रमाणात निधी देतो, असे शासनाला वाटते.  त्या तुलनेत विद्यापीठात संशोधन व सल्लासेवा उपलब्ध नाही. उच्च शिक्षणासाठी आयोग स्थापन करावे, पारंपरिक मुक्त व निरंतर शिक्षण व्यवस्थेची तफावत दूर करावी, विद्यापीठ कायद्यात आमूलाग्र बदल करावा आदी सूचना डॉ. निगवेकर यांनी केल्या. कुलगुरू डॉ. बंडगर यांचेही भाषण झाले. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव कॅ. नितीन सोनजे, परीक्षा नियंत्रक डी. जे. साळुंखे आदी उपस्थित होते.