पाचगणी, महाबळेश्वरच्या पाणी योजनांसाठी सव्वाचार कोटींचा निधी- मकरंद पाटील Print

वाई/वार्ताहर
महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळांना वेण्णा लेकमधून बहुआयामी योजनेच्या साहाय्याने पिण्याचे पाणी पुरवले जाते. या योजनेच्या बिघाडामुळे सध्या या शहरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. भविष्यकाळात अशा प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करून या योजनेला बळकटी देण्यासाठी आपण सुमारे सव्वाचार कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करणार असल्याची माहिती महाबळेश्वर-वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद आबा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आमदार मकरंद पाटील आज पाचगणी येथे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजूबाबा गायकवाड, ज्येष्ठ नेते ग्रॅब्रियल फर्नाडिस, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला महाडिक, नियोजन समिती सभापती संतोष कांबळे, नगरसेवक महेश चौरसिया, सचिन भिलारे, परवीन मेमन, कल्पना कासुर्डे, सुनंदा गोळे आदी उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत नुकतीच बैठक झाली असून दोन्ही पर्यटनस्थळांना स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आपण या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रयत्नशील असून तातडीने झालेल्या बैठकीत वेण्णा लेकच्या योजनेतील त्रुटी दूर करून नव्याने या योजनेचे पुनरुज्जीवन केल्यास पुढील काळात दोन्ही शहरांना सुरळीत पाणी पुरवठय़ास अडचणी येणार नाहीत. यासाठी तांत्रिक मंजुरीसाठी या अधिकाऱ्यांनी सव्वाचार कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगितले. आपण या निधीसाठी अंदाजपत्रकीय आराखडे तातडीने पाठवण्याचे आदेश जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले असून लवकरात लवकर यासाठीचा निधी आपण उपलब्ध करून देऊ असे सांगितले.
ते म्हणाले, याबाबत आपण लवकरात लवकर पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याबरोबर बैठक घेणार असून हा निधी तातडीने उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून आमदार म्हणाले, वेण्णा लेकच्या योजनेची विहीर पावसाळय़ात ६० ते ७० टक्के पडली होती. त्या वेळी संबंधित विभागाने तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती करून दोन्ही शहरांना पाणीपुरवठा चालू ठेवला होता. गेल्या आठ दिवसांपूर्वी ही विहीर पूर्णपणे पडल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. दोन्ही शहरे पर्यटनस्थळे असून पाचगणी हे शैक्षणिक केंद्र आहे.
पाचगणी हे शहर पूर्णपणे याच पाण्यावर अवलंबून आहे. या शहराला जर पाणी मिळाले नाही तर येथील संपूर्ण जनजीवन कोलमडून जाते यासाठी आपण लक्ष घातले असून तातडीने निधी उपलब्ध करण्यासाठी आग्रही आहे.  
या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव राधेश्याम मोफेलवार, मुख्य अभियंता माधव जवादे, अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे, यमगर, कार्यकारी अभियंता आवटी, अविनाश पांडकर आदी उपस्थित होते.