अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन खून; अपघात झाल्याचा बनाव Print

वडगाव मावळच्या चौघांविरुध्द गुन्हा
 सोलापूर /प्रतिनिधी
एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिचा खून केला व मृतदेह पुलाखाली टाकून अपघात झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी चौघाजणांविरूध्द सलगर वस्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात मृत मुलीचे वडील शंकर शिवाजी जाधव (वय ४४, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी क्र.६, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश दशरथ गायकवाड, त्याचे वडील दशरथ गायकवाड, आई सुनीता दशरथ गायकवाड व अभिजित दशरथ गायकवाड (रा. वडगाव मावळ, जि. पुणे) यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. आकाश गायकवाड याने सदर मृत मुलीला आपल्या मोटारसायकवर बसवून कर्नाटकात नेले होते. तेथून सोलापूरकडे परत येत असताना शहरात देगाव नाक्याजवळ पुलावर मोटारसायकल घसरल्याने अपघात होऊन त्यात सदर मुलगी जागीच मरण पावली. तर आकाश गायकवाड हा जखमी झाल्याची माहिती सलगर वस्ती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. परंतु मृत मुलीच्या वडिलांनी हा खुनाचा प्रकार असल्याची फिर्याद दिल्याने त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दशरथ अकबर गायकवाड यास अटक करण्यात आली आहे.
मुलाकडून पित्याचा खून
आपल्या पत्नीला माहेरी पाठवून दिल्याचा राग मनात धरून मुलाने पित्याचा खून केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे घडली. विजय हरिभाऊ फुगारे (वय ६५) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. तर याप्रकरणी त्याचा मुलगा संजय फुगारे यास पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. संजय याच्या पत्नीला वडील विजय यांनी भांडण काढून माहेरी पाठवून दिले होते.
तिला सासरी नांदविण्यासाठी आणण्यास ते तयार नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर संजय हा चिडून होता. याच कारणावरून दोघा बापलेकात भांडण झाले. यात रागाच्या भरात मुलगा संजय याने पिता विजय याच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.