कोल्हापूर खंडपीठ मागणी Print

कोल्हापूर/प्रतिनिधी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन सुरु  झाले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प झाल्याचा दावा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.
गेल्या २५ वर्षांपासून कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे यासाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला सोमवारपासून नव्याने सुरुवात झाली. जिल्ह्यातील वकिलांनी आज एकत्रित येऊन न्यायालयासमोर उभारण्यात आलेल्या शामियान्यात धरणे धरले. खंडपीठ मागणीच्या घोषणा दिवसभर दिल्या जात होत्या. दिवसभरात महापौर कादंबरी कवाळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विद्या चव्हाण यांच्यासह विविध पक्षांच्या प्रमुखांसह कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी हजर राहून आंदोलनास पाठिंबा दर्शविला.
तीन दिवस सुरु असलेल्या आंदोलनानंतर शासनाने प्रतिसाद न दिल्यास न्यायालयीन कामकाज बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी दिला. या वेळी बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. शिवाजीराव चव्हाण, जिल्हा बार असो.चे उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, सचिव अ‍ॅड. प्रकाश मोरे यांच्यासह वकील उपस्थित होते.