खंडकऱ्यांना ११ रोजी जमीन वाटप Print

सोलापूर / प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना या वर्षी दिवाळीचा दुहेरी आनंद मिळणार असून, ११ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना जमिनींचे वाटप करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर शेती महामंडळाच्या जमिनी वाटपाची राज्यातील पहिली सुरुवात या तालुक्यापासून होत असल्याची माहिती तालुका खंडकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा जमीन वाटप समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सोमनाथ वाघमोडे यांनी सांगितले.
तालुक्यातील मांडवे येथे ११ रोजी हा जमीन वाटपाचा कार्यक्रम होणार असून, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हेही या वेळी उपस्थित राहणार आहेत. ५० वर्षांपूर्वी शेती महामंडळास दिलेल्या जमिनी परत मिळण्यासाठी या खंडकरी शेतकऱ्यांना न्यायालयीन लढा लढावा लागला. त्यासाठी त्यांनी संघटनेची स्थापना केली होती. प्रदीर्घ लढय़ानंतर या खंडकऱ्यांना न्यायालयाने न्याय दिला.
शासनानेही यामध्ये समन्वयाची भूमिका घेतली. या लाभार्थी शेतकऱ्यांनीही स्वखर्चाने या जमिनीतील झाडेझुडपे काढून राज्यातील खंडकऱ्यांसमोर आदर्श ठेवला. त्यांना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर या कारखान्यांनीही मदत केल्याचे वाघमोडे यांनी सांगितले. तालुक्यातील मांडवे, सदाशिवनगर, मेडद, भांबुर्डी, जाधववाडी, माळशिरस, येळीव, शिवपुरी, माळखांबी, महाळुंग, बोरगाव, लवंग आदी गावांतील खंडकरी शेतकऱ्यांना ६ हजार १०० एकर जमिनीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप होणार असून, त्यांच्या मालकीच्या ७/१२ उताऱ्याचेही वाटप होणार आहे.