गोपाळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे Print

अध्यक्ष पाटील यांचे पद संपुष्टात
कोल्हापूर / प्रतिनिधी
जाखले (ता. पन्हाळा) येथील गोपाळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाबाबतचा दावा धर्मादाय आयुक्तांनी फेटाळल्याने संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांचे अध्यक्षपद संपुष्टात आल्याची माहिती संस्थेचे संचालक पांडुरंग नाना पाटील, पांडुरंग महादेव पाटील, दिनकर बोराटे व नसीर कुरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोपाळेश्वर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाचा वाद गेली ७ वर्षांपासून सुरू होता. संस्थेच्या कार्यकारी मंडळासाठी सन २००४ ते२००७ या सालाकरिता नियमानुसार निवडी होऊनसुद्धा तत्कालीन सचिव दिलीप श्यामराव पाटील व सध्याचे जिल्हा परिषदेचे डी.आर.डी.एच. प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांनी संगनमताने संस्थेचे दप्तर पळवून नेऊन या दप्तराच्या आधारे सर्व संचालक मंडळाच्या बनावट सह्या करून तसेच बनावट शिक्के व संस्थेचे लेटरपॅड बनवून फेरफार करून बोगस कार्यकारी मंडळ तयार केले होते.
त्या कार्यकारी मंडळाच्या मान्यतेसाठी धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडे दावा दाखल केला होता. तोच दावा आता फेटाळल्याने त्यांची पदे आता संपुष्टात आली असल्याची माहिती इतर वरील सर्व संचालकांच्या वतीने नसीर कुरणे यांनी दिली.
गोपाळेश्वर शिक्षण संस्था ही एक या परिसरातील जुन्या जाणत्या लोकांनी सुरू केलेली संस्था असून, यामध्ये माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील व माजी सभापती विश्वनाथ सरनाईक आदींचा संस्था उभारणीत सिंहाचा वाटा आहे.