कृष्णा - भीमा स्थिरीकरणाचे काम त्वरित हाती घ्यावे - केळकर Print

सोलापूर/प्रतिनिधी
कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे काम त्वरित हाती घ्यावे या प्रमुख मागणीसह जिल्ह्य़ातील विविध कामाच्या योजना तातडीने मार्गी लावण्याचे निवेदन विधान परिषद सदस्य तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी राज्याच्या समतोल प्रादेशिक विकास उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉ. विजय केळकर यांना दिले आहे.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेस सन २००४ साली प्रशासकीय मान्यता मिळाली असून या योजनेचा ४२६ गावांतील ३५ लाख लोकांबरोबरच २३ साखर कारखाने व अनेक औद्योगिक वसाहतींना याचा लाभ होणार असल्याचे या निवेदनात विषद केले असून १९८४ साली प्रशासकीय मान्यता मिळालेल्या नीरा देवघर धरणाच्या कालव्याची माळशिरस तालुक्यातील कामे त्वरित पूर्ण व्हावीत. भीमा नदीवरील जांबूडच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणी उचलून नीरा उजव्या कालव्याच्या ७७ मैलात सोडण्याच्या मंजूर योजनेस निधी मिळावा.
मंगळवेढा तालुक्यातील तेल धोंडा व चाळीस धोंडा योजनेतून ६ टीएमसी पाणी त्या तालुक्यातील ३५ गावांना मिळण्यासाठी निधी मिळावा. भीमा व नीरा नदीवर बॅरेजेस बांधून वाया जाणारे पाणी वाचवावे.
जिल्ह्य़ातील निधीसाठी बंद असलेल्या दहीगाव करमाळा, आष्टी मोहोळ, एकरूख अक्कलकोट, शिरापूर उत्तर सोलापूर, बार्शी, तसेच टेंभू व म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांना निधी मिळावा. राजेवाडी तलावाचे पाणी शिंगोर्णी बचेरी तर धोमबलकवडीचे पाणी पश्चिम माळशिरस तालुक्यास मिळावे. तालुक्यातील अवर्षण प्रवण प्रक्षेत्रात पाझर तलाव व सिमेंट बंधारे व्हावेत. माळशिरस तालुका हरियाली योजनेत समाविष्ट करावा.
संत तुकाराम व ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग ६ पदरी करावेत. तालुक्यातील विविध योजनेतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा. तालुक्यात आणखी ३ प्राथमिक आरोग्य केंद्र व १४ उपकेंद्रांवर मंजुरी मिळावी, तालुक्यासाठी औद्योगिक वसाहतीला मंजुरी मिळावी अशा विविध मागण्या मोहिते पाटील यांनी केल्या आहेत.