भैयासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीनिमित्त सोलापुरात व्याख्यानमाला Print

सोलापूर /प्रतिनिधी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव ऊर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त सोलापुरात येत्या ९ नोव्हेंबर रोजी मोटारसायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच तीन दिवस व्याख्यानमालाही होणार आहे.
डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़गृहात ९  ते ११ नोव्हेंबर या कालावधीत भैयासाहेब आंबेडकरांच्या  जीवनकार्यावर आधारित व्याख्यानमाला  होणार आहे. या व्याख्यानमालेत ‘भैयासाहेब आंबेडकर-एक दडपलेला इतिहास’ या विषयावर साहित्यिक ज.वि.पवार  बोलणार आहेत.औरंगाबाद येथील प्रा. भारत शिरसाट हे ‘भैयासाहेब आंबेडकर-व्यक्ती आणि विचार’ या विषयावर संवाद साधणार आहेत. तर  प्रा. अविनाश डोळस यांचे ‘आंबेडकरी चळवळीत भैयासाहेब आंबेडकर पिढीचे योगदान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
दि. ९ रोजी दुपारी तीन वाजता न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोटारसायकल फेरीचा प्रारंभ होणार आहे. त्याचा शुभारंभ पोलीस आयुक्त प्रदीप रासकर हे करणार असल्याचे डॉ. सुरेश कोरे यांनी सांगितले. ही मोटारसायकल फेरी शहरात विविध मार्गावर फिरून पार्क चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन विसर्जित होणार आहे. या वेळी उपस्थितांना २२ प्रतिज्ञा देऊन फेरीचा समारोप केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.