सोलापूरात मराठी रंगभूमीदिन साजरा Print

सोलापूर /प्रतिनिधी
जागतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या सोलापूर उपनगरीय शाखेच्या वतीने नटराज पूजन आणि रंगमंच पूजन स्मृतिमंदिराचे नूतन व्यवस्थापक दीपक पवार व प्रदीप जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
महापालिकेमध्ये सेवेत असताना हुतात्मा स्मृतिमंदिरात व्यवस्थापकपद मिळणे आणि त्या माध्यमातून नटराज तथा मराठी रंगभूमीची सेवा करायला मिळणे हे आपल्या सेवेचे पारितोषिक आहे, असे उद्गार दीपक पवार यांनी यावेळी काढले. आपणास जेवढी होईल तेवढी मराठी रंगभूमीची सेवा करू, असे ते म्हणाले. यावेळी नाटय़ परिषदेच्या उपनगरीय शाखेचे अध्यक्ष रेवण उपारे यांनी हुतात्मा स्मृतिमंदिर हे कलावंतांचे मंदिर असून या मंदिरात आले की मन प्रसन्न होते, असे मनोगत मांडले. शरद कला व क्रीडा मंचचे आनंद मुस्तारे यांनीही विचार मांडले. यावेळी नाटय़ व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष गफूर बागवान, स्थानिक ज्येष्ठ रंगकर्मी सुशीला व्हनसाळे, राजा बागवान, शिवकुमार पाटील, नागेंद्र मानेकरी, गौस शेख आदी उपस्थित होते. नाटय़ शाखेच्या उपनगरीय शाखेचे कार्यवाही गुरू वठारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर उपाध्यक्ष प्रशांत बडवे यांनी आभार मानले.