‘कराड अर्बन बँकेचे योग शिबिर निश्चितच फलदायी ’ Print

बँकेच्या योग शिबिराचा समारोपकराड/वार्ताहर
सदोष आहार, वाढती व्यसने, बैठे जीवन व ताणतणावामुळे रोगाचे प्रमाणे वाढत चालले असून आपल्या बँकेतील सेवकांनी निरोगी राहावे यासाठी कराड अर्बन बँकेने राबविलेला योग शिबिराचा उपक्रम निश्चितच चांगला असल्याचे कोल्हापूर येथील जी. जे. जी. योग अ‍ॅकॅडमीचे संस्थापक डॉ. धनंजय गुंडे यांनी सांगितले.
कराड अर्बन बँक स्पोर्ट्स क्लबतर्फे कराड अर्बन बँकेतील सेवकांसाठी आयोजित योग शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, प्रशासन विभागप्रमुख माधव माने, स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष दिलीप चिंचकर, यांच्यासह बँकेचे संचालक व सेवकांची या वेळी उपस्थिती होती.
डॉ. धनंजय गुंडे यांनी या वेळी आहाराचे महत्त्व विशद केले. लोक पैसा, प्रसिद्धी व सामाजिक स्थिती याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे त्यांचे लक्ष नाही. परंतु आपली खरी संपत्ती मेंदू, डोळा, हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड आहे.
योग्य व्यायाम व योगसाधना याद्वारे आपण आपले आरोग्य चांगले राखू शकू. मानसिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक व आध्यात्मिक या सर्वच आरोग्याची आपल्याला आवश्यकता असून, त्यासाठी योगसाधना करावी. आयुष्यामध्ये गेलेला पैसा, तुटलेली मैत्री, दुसरी पत्नी पुन्हा मिळू शकेल. परंतु, एकाच व्यक्तीचे दुसरे शरीर निर्माण होणार नाही याचा विचार करून प्रत्येकाने आरोग्यसाधना केली पाहिजे.
डॉ. सुभाष एरम म्हणाले, की बँकेतील
सेवक शरीराने व मनाने निरोगी राहावेत यासाठी डॉ. धनंजय गुंडे यांच्या योग शिबिराचा निश्चितपणे उपयोग होईल. त्यामुळे यापुढील काळात डॉ. धनंजय गुंडे यांनी शिकवलेली योगसाधना नियमितपणे करावी. त्याची आपल्या जीवनात निश्चित उपयोग होईल.  
कराड अर्बन बँकेमध्ये यापूर्वी सेवकांसाठी डॉ. धनंजय गुंडे यांची आठ शिबिरे संपन्न झाली असून, या वर्षांतील हे तिसरे शिबिर आहे. त्याचा लाभ बँकेतील सेवक, त्यांचे कुटुंबीय व नागरिकांनी घेतला.
डॉ. धनंजय गुंडे यांच्या योग शिबिराबद्दल जयश्री गुरव, ज्योती वाघ, नीलम जमाले, संदीप पवार, चंद्रकांत जिरंगे, किशोर जाधव, शहाजी जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. वैभव माने यांनी केले.