अण्णा व बाबांनी समाजाच्या भल्यासाठी एकत्र यावे - व्यास Print

सोलापूर /प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व योगगुरू बाबा रामदेव ही दोन्ही चांगली व सत्प्रवृत्तीची माणसे असून त्यांनी एकत्र येऊन समाजाच्या कल्याणासाठी कार्य करावे. यात संपूर्ण देशाचे हित असल्याचे मत आचार्यन किशोर व्यास यांनी व्यक्त केले.
तीन दिवसांच्या ज्ञानयज्ञासाठी आचार्य किशोर व्यास हे सोलापुरात आले असता बुधवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यास यांनी देशातील सध्याच्या राजकीय, सामाजिक तसेच प्रसारमाध्यमांच्या स्थितीवर भाष्य केले. देशातील काँग्रेस व भाजपसह सर्वच राजकीय पक्षांची विश्वासार्हता गमावली गेली असून आता सर्वच राजकीय पक्षांचे शुद्धीकरण होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी मांडले.प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता व त्यांच्या कार्यपद्धतीवर बोलताना ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमे विदेशी लोकांच्या ताब्यात गेली असून ती अधिक भ्रष्ट झाली आहेत.इतकेच नाही तर देशातील  सर्वच  इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमांनी  आपली विश्वासार्हता गमावली आहे. मात्र त्या तुलनेत मुद्रित प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता अद्याप टिकून असल्याचा शेरा त्यांनी  मारला.प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या उलट-सुलट बातम्यांमुळे समाजाला एखाद्या घटनेबद्दल नेमकी वस्तुस्थिती कळणे कठीण झाल्याचे आचार्य व्यास यांनी सांगितले.या वेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी संदीप जव्हेरी व राज मिणियार आदी उपस्थित होते.सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज व्हटकर यांनी उपस्थिचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.