गगनबावडय़ात ‘बल्क कुलर योजना’ - डोंगळे Print

कोल्हापूर/प्रतिनिधी
दुर्गम भागासाठी अत्यंत उपयोगिता असणारी ‘बल्क कुलर योजना’ गगनबावडा तालुक्यात सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष  अरुण डोंगळे यांनी कोल्हापूर येथील व्ही. टी.पाटील सभागृहामध्ये झालेल्या पन्हाळा-गगनबावडा तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभेमध्ये केले.
बल्क कुलर योजना गोकुळने प्रायोगिक तत्त्वावर प्रथम करवीर तालुक्यातील चार गावांमध्ये सुरू केली. योजना दुर्गम भागासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने करवीर तालुक्यानंतर गगनबावडासारख्या दुर्गम तालुक्यात सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून डोंगळे म्हणाले, पावसाळ्यामध्ये दुर्गम भागातील काही ठिकाणी दूध संकलन करणे शक्य होत नाही. यावेळी बल्क कुलरचा उपयोग होणार आहे.
स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी केले सभेच्या सुरुवातीस चेअरमन अरुण डोंगळे, अरुण नरके, आनंदराव पाटील-चुयेकर, रवींद्र आपटे व कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्था प्रतिनिधींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात होत असताना दूध संस्थांच्या वतीने अरुण डोंगळे व संचालक मंडळाचा पशुखाद्याच्या पोत्यास ७५ रुपये अनुदान व ४३ कोटी ६५ लाख रुपये इतका विक्रमी दूध दर फरक दिल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला
 सभेसाठी रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, राजकुमार हत्तरकी, दिलीप पाटील, दीपक पाटील, धैर्यशील देसाई, बाबासाो चौगले, पी. डी. धुंदरे, दिनकर कांबळे, अरुंधती घाटगे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर तसेच अधिकारी व पन्हाळा, गगनबावडा तालुक्यांतील ४०० दूध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. संचालक विश्वास जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.