सातारच्या लघुपट महोत्सवात चाफळकरांचा लघुपट सर्वोत्तम Print

सोलापूर /प्रतिनिधी
सातारा येथील नैतिक क्रिएटर्स संस्थेने आयोजिलेल्या सातारा लघुपट महोत्सवात सोलापुरातील वास्तुविशारद अमोल चाफळकर यांनी तयार केलेल्या ‘कवितेला वाटले चित्र व्हावे’ या लघुपटाला सर्वोत्तम लघुपटाचा मान मिळाला. वीस हजार रोख,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. याच महोत्सवात रुद्रेश बदलुरे यांच्या ‘देवाघरचे देणे’ या लघुपटाला द्वितीय पारितोषिक मिळाले.
रवींद्रनाथ टागोरांच्या चित्रकलेची ओळख करून देणाऱ्या अमोल चाफळकर यांच्या ‘कवितेला वाटले चित्र व्हावे’ या १४ मिनिटांच्या लघुपटाला रवींद्र संगीताचे पाश्र्वसंगीत लाभले आहे.
टागोरांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षी चित्रे काढण्यास सुरूवात केली. पुढील बारा वर्षांत त्यांनी अडीच हजारांपेक्षा अधिक चित्रे रेखाटली. टागोरांच्या या अतिशय वेगळ्या, आधुनिक, परंतु दुर्लक्षित चित्रांची रसिकांना ओळख करून देण्याच्या हेतूने चाफळकर यांनी हा लघुपट तयार केला आहे.
सातारच्या या लघुपट महोत्सवात मुंबई, पुण्यासह औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा आदी भागातून १९९ लघुपट आले होते. त्यातील ४५ लघुपटांचे प्रदर्शन झाले.
यात अमोल चाफळकर यांचा लघुपट सर्वोत्तम ठरला, तर रुद्रेश बदलुरे यांच्या लघुपटाला द्वितीय पारितोषिक मिळाले. या यशाबद्दल चाफळकर व बदलुरे यांचे सोलापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.