सोलापुरात यंत्रमाग कामगारांना दिवाळीसाठी सहा टक्के बोनस Print

आमदार प्रणिती शिंदे यांची शिष्टाई
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापुरातील यंत्रमाग कामगारांना दिवाळीसाठी हक्क रजेपोटी सहा टक्के बोनस देण्याचा निर्णय यंत्रमागधारक संघ व कामगार प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. यंत्रमाग कामगारांना हक्करजेपोटी दिवाळी बोनस प्रश्नावर यंत्रमाग कामगार व मालकांच्या प्रतिनिधींच्या वाटाघाटी तीन-चारवेळा झाल्या होत्या. यात सहायक कामगार आयुक्त विजयकुमार देशमुख यांनीही तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात कोणताही यशस्वी तोडगा निघत नव्हता. दरम्यान, या प्रश्नावर आमदार प्रणिती शिंदे यांचे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन पुन्हा एकदा यंत्रमाग कामगार व मालक प्रतिनिधींची संयुक्त बैठक सहायक कामगार आयुक्त कार्यालयात आयोजित करायला लावली. या वेळी सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघासह जयहिंद श्रमिक कामगार संघटना, सोलापूर जिल्हा यंत्रमाग कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा होऊन त्यात अखेर यंत्रमाग कामगारांना दिवाळीसाठी हक्क रजेपोटी सहा टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.