खुनी हल्ल्यात सरपंचासह चौघांना जामीन नाकारला Print

सोलापूर /प्रतिनिधी
माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे अनिल कदम यांच्यावर प्राणघातक हल्ला
केल्याप्रकरणी अटकेत असलेले  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आकुंभे गावचे सरपंच संदीप कदम यांच्यासह चौघाजणांचा जामीन अर्ज सोलापूरच्या सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
अनिल कदम यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी सरपंच संदीप कदम यांच्यासह अमोल कदम, औदुंबर करंडे व हणमंत पाटोळे चौघांना अटक केली.
अटक झाल्यानंतर या चौघा आरोपींनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यांच्या जामिनाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. मराठे यांच्यासमोर झाली.
सुनावणी वेळी चारही आरोपी हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसात नोंद असल्याबद्दल शपथपत्र फिर्यादीतर्फे दाखल  करण्यात आले होते. या शपथपत्राचा  विचार करून न्यायाधीशांनी  या चारही  आरोपींना जामीन नाकारला.
यावेळी सरकारतर्फे अ‍ॅड. साधना पाटील तर मूळ  फिर्यादीतर्फे अ‍ॅड. धनंजय माने व अ‍ॅड. जयदीप माने यांनी काम पाहिले, तर आरोपीतर्फे अ‍ॅड. पी. जी. देशमुख यांनी बाजू मांडली.
गेल्या २२ ऑक्टोबर रोजी पूर्ववैमनस्यातून आकुंभे गावचे सरपंच संदीप कदम यांच्यासह अमोल कदम, औदुंबर करंडे व हणमंत पाटोळे यांनी कोयत्याने कदम यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.